Tuesday 24 August 2021

Positive Review for "कानडे फूड्स "

#मला_सापडला_जिनी_खाऊचा 

आपण सर्व लहानपणापासून परीकथा ऐकत आलो आहोत. त्यातील परी ज्याच्यावर प्रसन्न होते त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते मग ती इच्छा कुठलीही असो... हो ना... 

आता तुम्हाला माझ्या लोणचे प्रेमाबद्दल तर माहीतच आहे😁 पण त्याही व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींवर माझे जीवापाड प्रेम आहे...  

जस की घरगुती उत्पादन असणारी  खुसखुशीत जीरा खारी, बहुतांश प्रकारचे खाकरा, ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा, गव्हाच्या लाह्यांचा चिवडा, फणस पोळी, आंबा पोळी, आंबा वडी, फणसाची रेडी टू कुक भाजी, दालमूठ, पातळ पोह्यांचा न तुटलेला चिवडा, अळूवडी आणि बरच काही... लिस्ट तर संपणारी नाहीये माझी😜...

तर हल्ली आमचं पोट भलत्या वेळी असलं काहीबाही खाण्याची इच्छा व्यक्त करत असते☺️... मग काय आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी " आमचे बाबा 👨🏻" ( आता अमु चे बाबा म्हणजे माझे पण बाबा 🙈) जीवाचा आटापिटा करतात आणि भन्नाट दुकानं शोधून काढतात 😛 जिथे सर्व प्रकारची घरगुती उत्पादन उपलब्ध असणारी खाद्यपदार्थ सहज मिळू शकतील.

असाच एक जादूचा घरगूती खाऊचा दिवा आमच्या ह्यांना साधारण महिनाभरापूर्वी सापडलाय त्याच नाव आहे "कानडे फूड्स " चे " अग्रज  फूड प्रोसेसर्स " आणि तेथील जिनीच नाव आहे सौ. स्मिता कानडे 😁 

ह्यांच्याकडे फक्त इच्छा व्यक्त करण्याची देर की ती वस्तू दुसऱ्याच क्षणाला तुमच्यासमोर हजर .... सर्व काही हायजेनिक, फ्रेश आणि रिजनेबल दरात.... आता घरगुती म्हंटल्यावर किंमतीत थोडंफार इकडेतिकडे चालणारच पण चवीची हमी नक्कीच. विविध प्रसिद्ध उत्पादकांची उत्पादने ह्यांच्या जादुई दिव्याखाली फट म्हणता हजर असतात. त्यातील काही म्हणजे आठवले, पालेकर, देसाई, सहस्त्रबुद्धे आणि इतर अनेक उत्पादकांची उत्कृष्ट खाद्यपदार्थे... 

कुरकुरीत मेथी मठरी, गोड पण तोंडात विरघळणारी शंकरपाळी, चकली, बॉबी म्हणजेच आपले पोंगे, रेडी टू सर्व्ह सरबते त्यात कोकम, कैरीचे पन्हे, जांभूळ सरबत, पेरूचे सरबत, आवळ्याचे सरबत, गुलकंद, गव्हाची जीरा खारी, डोनटस, मफिन्स, कप केक्स, घरगुती नानखटाई, मैदा फ्री बिस्किट, शुगर फ्री लाडू...

आजकालच्या इन्स्टंट जमान्यात शिक्षणासाठी ,नोकरीनिमित्त घरापासून दूर असणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार मंडळींसाठी घरच्या चवीची आणि दोन मिनिटात फटाफट होणारी इन्स्टंट साधी डाळ खिचडी, मसाला भात, मेथी मलई, पराठे, अंबाडीची भाजी, पनीर च्या भाज्यांचे प्रकार, विदर्भातील मेतकूट, डांगर पीठ, सर्व प्रकारची आंबट,गोड, मिक्स लोणचे, विविध खाद्यतेल उत्पादने आणि अजूनही बरच काही ह्यांच्या जादूच्या दिव्याखाली मिळते.

हुश्श sssss... 

माझ्या तर खाण्याच्या हौशी हल्ली इथूनच पूर्ण होतायेत. मॅडम चा स्वभाव खूपच बोलका आणि मनमिळाऊ असल्याने पटकन ओळख होते. आपुलकी आणि उत्पादनांची माहिती आणि त्यातील फायदे देखील समजून सांगतात हे न मला तरी जास्त आवडले. खुप खुप धन्यवाद स्मिता मॅम ह्यासाठी😊

अरे हो... एक विसरलीच 😄 

काही दिवसानंतर पुण्यातील प्रसिद्ध " श्रेयस डायनिंग हॉल " ची थाळी देखील ह्यांच्याकडे पार्सल मिळू शकणार त्यामुळे घाई करा आणि त्वरित संपर्क साधा- सौ. स्मिता कानडे ह्यांच्या " अग्रज फूड प्रोसेसर्स " ला..... फोन नंबर. - +919422058663

तुम्ही सर्व फोटोज मधील प्रोडक्ट बघू शकता आणि हो पत्ता देखील फोटो मध्ये दिलाय आहे😊 एकदा भेट द्याल तर नक्की काहीतरी खरेदी करूनच बाहेर पडाल😁 माझी खात्री..... 

एक समाधानी ग्राहक मधुरा...

©® ✍🏻सौ. मधुरा माधव देशपांडे

Positive Review for Cafe मस्कापाव...👍

लॉकडाऊन थोडं शिथिल झालेलं म्हणून ह्या छान भुरभुर पावसात ☺️  कुठेतरी जवळपास फिरायला जाऊन थोडं चटक मटक खाऊन बघावं म्हणून खोटं खोटं रागवायचा खटाटोप बाकी काही नाही😜 

" नाकावरच्या रागाला औषध काय?🤔
गालावरच्या फुग्यांच म्हणणं तरी काय?🤔
माझी लाडली ग, माझी गोडली ग 😍
सांगा आमच्या छकुलीला झाल तरी काय?🤔"  

"कळत नकळत" सिनेमातील हे गाणं लागायची आणि अहोंच्या बायकोला उगागच फुगून बसायची एकच वेळ झाली😝 मला कुरकुरीत पेरी पेरी फ्राईज🍟 खायचेत सोबत बन मस्कापाव🍞 आणि मसाल्याचा चहा☕ पण हवाय आत्ताच्या आता😢 

आणि मग न सांगता गाडी वळली ती निगडी प्राधिकरण येथील "कॅफे मस्कपाव" कडे. वंदना ताईंची ह्यासंबंधीत असणारी जाहिरात नुकतीच काही ग्रुप्सवर बघण्यात आली होती. 

लॉकडाऊन थोडं शिथिल झालेलं म्हणून मग स्वतःच जाऊन खाऊन बघावं म्हणून खोटं खोटं रागवायचा खटाटोप बाकी काही नाही😜  

मी चहाप्रेमी असल्याने मसाला चहा आणि बन मस्का मागवला, सोबतच व्हेज पोटॅटो सँडविच, पनीर ग्रील सँडविच आणि पेरी पेरी फ्राईज🍟 आता रागावली आहे म्हणून इतकुसच बोलवलं 😛 मुलासाठी व्हेज ग्रील सँडविच, कोल्ड कॉफी मागवली. ह्यांनी कॅफेत आणलंय म्हंटल्यावर त्यांच्या आवडीची बन भुर्जी, अंडा ऑम्लेट सँडविच, मसाला चहा ऑर्डर केला. 

कोरोना संबंधित सर्व नियम पाळून स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन कॅफेमध्ये पार्सल सुविधा सुरू होती आणि पटकन खायचे अथवा चहा प्यायचा असल्यास कॅफेबाहेर टेबल खुर्च्या ठेवल्या होत्या. 

सेल्फ सर्व्हिस सिस्टीम एकदम छान, पेपर प्लेट्स मध्ये पदार्थ सर्व्ह करण्याची पद्धत आवडली विशेषतः ह्या कोरोना काळात 👍 पदार्थ घेऊन जाण्यासाठी स्वच्छ ब्लॅक ट्रे 👍 प्रत्येक टेबल स्वच्छ आणि विशेषतः खुर्च्या व्यवस्थित मांडलेल्या👍 सर्व टेबल्सवर पाण्याच्या बॉटल फिल्टर पाण्याने भरून ठेवलेल्या👍 फिल्टरच्या बाजूला सॅनिटायझर होते आणि बेसिनजवळ हॅन्डवॉश देखील होते. एकंदरीतच ग्राहकांच्या आरोग्याची काळजी पुरेपूर घेण्याची सोय असलेली दिसली. टेबलांमधील अंतर देखील पुरेसे होते👍 लायटिंग व भित्तीचित्रे मला फार आवडले आणि अभिप्राय भिंत मस्तच 👌 

आता खाण्याकडे वळूया - 

१) बनमस्का - Wow 👌 ताजा बन , फ्रेश, मऊ आणि भरपूर लोण्याने माखलेला 🤤 I think Amul Butter वापरलेले. 

२) चहा - मसाला चहा ☺️ माफक गोड माझ्यासारख्या कडक शुगरवाल्यांना चालेल असा. आम्ही तब्बल ४ कप घेतला😜 सुरवातीला २ कप नंतर शेवटी निघतांना २ कप.

३) व्हेज चीझ ग्रील सँडविच - पहाताच पोरगं बाबो 😲 आई इतके मोठे तुकडे😛 त्यावर भरपूर किसलेलं चीझ आणि साईडला My  Favorite पोटॅटो चिप्स☺️ पहिल्याच घासात विकेट पडली 👍 मस्तच चव आणि स्पेशली त्यावर लावलेली ग्रीन चटणी😋 मजा आली. पोरगं व्हेज चीझ ग्रील सँडविच मध्येच आउट झालं😂

४) पेरी पेरी फ्रेंज फ्राईज - व्यवस्थित तळलेले, मसाल्याने छान कोट झालेले 👌 क्रिस्पी We Love It 😍

५) एग ऑम्लेट सँडविच - आमच्या ह्यांच्यासाठी ☺️ आता बायको व पोरग एवढं मजेने ताव मारून खाताय म्हंटल्यावर नवरोबा को भी तो कुछ ट्रीट मिलनी चाहिजे के नाही 🤔 म्हणून मग बोलवलं एग ऑम्लेट सँडविच 👍 खूप छान चव तिखट जे मुद्दाम बनवायला सांगितलं होतं.. आणि पुन्हा साईडला पोटॅटो चिप्स🤗 माझ्यासाठी हो....🤣😂 

६) बन भुर्जी - झटका👌 असं हे म्हणाले, छान तिखट भुर्जी आणि सोबतीला काकडी स्लाइस व लिंबाची फोड👍 बन तर इतका मऊ आणि बटरी की तोडतांनाच कापसाला हात लावल्याची फीलिंग😊 
ह्यांना आवडले पुन्हा यावं लागेल म्हणाले😎 माझ्यासाठी तर लॉटरीच....😍

७) पनीर ग्रील सँडविच - मस्त मस्त तिखट मी तिखटप्रेमी ना म्हणून 😛 तुम्ही जस हवं तसं बनवायला सांगू शकता👍 छान क्रिस्पी👌 ब्रेडच्या कडा व्यवस्थित भाजल्या गेलेल्या. पनीर टाकण्यात इतर ठिकाणी करतात तशी कंजूसी अज्जिबात नाही मोठ्या प्रमाणात पनीर क्रश आणि तुकडे येतात 😍.

बघा गेलो होतो फक्त बन मस्का खाण्यासाठी आणि आने दो आने दो म्हणतं इतकं सगळं पोटभर खाऊन वापस आलो.... शाम बन गयी मेरी तो.... दस बारा फोटो तो बनता हैं ना भाई.... खिचिक खिचिक...😜

मॅकडोनल्डला जाऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा कॅफे मस्कापाव ला जाऊन हायजेनिक वातावरणात विशेषतः मराठी कुटुंबाने चालवलेल्या ह्या पोटभरीच्या मेनूला पसंती दिलेली माझ्यामते तरी केव्हाही चांगली👍🙂

*कॅफे मस्कापावला जाण्यासाठी सगळ्यात सोपा पत्ता असा -

 आकुर्डी रेल्वे स्टेशन समोर पाठ करून उभे राहिल्यास नाकासमोर जो सरळ रस्ता जातो त्यावर गेल्यास अर्धा मिनिटात डाव्या हाताला केरला भवन दिसेल. त्याच्यासमोर पाठ करून उभे राहाल तर डोळ्यांसमोरच कॅफे मस्कापाव चा मोठा बोर्ड दिसेल चार ते पाच पायऱ्या उतरून तळाला कॅफेमध्ये जाऊ शकता👍

कॕफे ओनर वंदना मिलिंद दांडेकर.
कॕफे अॕड्रेस 
कॕफे मस्का पाव.
शाॕप नं ४ गणेश एनक्लेव,
सि.एम.एस. केरला भवन समोर,
इंडियन बँकेच्या खाली.
अकुर्डि स्टेशन रोड. अकुर्डि.

9225601877/ 8329005180

✍🏻©®सौ. मधुरा देशपांडे

Sunday 3 May 2020

कैरीचं तात्पुर लोणचं

कैरीच_तात्पुरत_लोणचं

" गोड तुरट थोडं खारट,
तात्पुरत घातलय मी लोणच आंबट।
मिळाल्या शंभर च्या कैऱ्या चार,
नव्हत्या गावराण पण कलमी फार।।

झटपट आणून पाण्यात बुडवल्या🛀,
खळखळ चोळून 👐त्यांना धुतल्या।
वेळ झाली होती कैऱ्या पुसण्याची,
केली तयारी लोणचे मसाल्याची😁।।

लवंग मेथ्या शोपा घेतल्या,
कढईत खमंग भाजून काढल्या।
हिंग हळद डाळ मोहरीची,
निगुतीने घ्या नाहीतर कडवट 😨व्हायची।।

तिखट मात्र मी जास्तीच घेतले,
खार खाल्ल्यावर झटके जाणवले😎।
छान परातीत आळे करून,
कोमट तेल🍶 हळूच टाकले वरून।।

चमच्याने सर्व मसाला मिसळला,
कैरीच्या बारीक फोडी चिरल्या🔪।
कैरी अन मसाल्याचे🍲 झाले हो मिलन💏,
फोडींवर पसरले तेलाचे तवंग।।

अस्सा दरवळ सुटला घरभर😌,
पोरग आलं घेऊन पोळी🍪 भरभर।
"आई मला देऊ नको आज तू मार👋,
त्यापेक्षा भारी आहे पोळी अन खार👌"।।

फोटोशूट झाले असे पटकन,
डोळ्यांतून थेंब दोन💧💧पडले टपकन।
नेहमी म्हणायची माझी आज्जी,
घरात असता लोणचे फिकीर नको भाजीची।।

Monday 23 July 2018

Bharleli Simla Dhabbu Mirchi

भरलेली सिमला ढब्बू मिरची 

साहित्य: 
५ ते ६ गोल आकारची ढब्बू सिमला मिरची आतून बिया काढलेली, हळद १/२ चमचा, तिखट २ चमचे, जिरे १ चमचा, मीठ चवीनुसार, धणेपूड, बेसन दीड वाटी, तेल ३ वाटी आवश्यकतेनुसार 

कृती: 
सिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यातील बिया आणि देठ काढून घ्या. एका मोठ्या वाडग्यात बेसन घेऊन त्यात तिखट, हळद ,मीठ, धणेपूड आणि जिरे टाकून एकत्र करा. 
सर्व मिश्रण एकत्र करत असताना त्यात थोडे थोडे तेल टाकून भिजवत रहा सैलसर झाले कि पोखरलेल्या मिरच्या घेऊन त्यात ते तयार वाटण पूर्णपणे भरून घ्या. 
  
    











आता मंद आचेवर पसरट कढई ठेऊन त्यात २ पळ्या तेल टाकून वाटण भरून तयार केलेल्या मिरच्या त्यावर अलगद नीट अंतरावर ठेवा. झाकण ठेऊन वाफेवर शिजू द्या. अधेमधे झाकण काढून मिरच्या पालटत रहा म्हणजे व्यवस्थित शिजतील. 

साधारण ३० मिनिटांनी बेसन भरलेल्या मिरच्या रंग बदलून पूर्णपणे आतून शिजतील तेव्हा आच बंद करून भाकरी अथवा पोळी बरोबर लिंबू पिळून खायला द्या. 






  

Bread Slice Crush

* ब्रेड_स्लाइस_क्रश् 



'तो अथवा ती, माझा अथवा माझी, पहिला अथवा पहिली "क्रश" आहे यार...'
काय मंडळी दचकलात न मी क्रश म्हणाली म्हणून.  क्रश म्हणजे अजाणतेपणी नकळत झालेले पहिले प्रेम ( म्हणजे असं आपल्याला वाटते ) मग ते कोणाचं कोणावरही असू शकते.

यात फक्त व्यक्तींवरच आपला क्रश होतो असे नाही बरं.
क्रश हा खाण्यावर, एखाद्याच्या लिखाणावर, पदार्था वर, एखाद्याच्या personality वर, गुणांवर, एखाद्या कलाकृतीवर आणि अगदी निर्जीव वस्तूवर सुद्धा हो
ऊ शकतो.
असे क्रश माझ्या आयुष्यात खूप वेळेस आले.

माझा सगळ्यांत पहिला movie क्रश होता मी थिएटर मध्ये बघितलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ)
How romantic जणू काजोल च्या जागी मीच 
क्रिकेट मधला पहिला आणि शेवटचा क्रश जो या जन्मात तरी कधीच पुन्हा होणार नाही तो म्हणजे  'माझा सचिन '.

माझा यासाठी म्हणाली कारण क्रिकेट समजायला लागल्यापासून फक्त आणि फक्त सचिनसाठीच मी क्रिकेट बघायची, त्याच्या फोटो साठी कित्येक वर्तमानपत्र चाळून त्यांना जाळ्या पाडल्यात. 
बारावी च्या परीक्षेला भारत-पाकिस्तान वन डे मॅच होती, 11 वाजता सेंटर वर पोहोचायचं होत, इंग्रजी चा पेपर होता. सचिन 90 वर खेळत होता. "त्यानी लवकर 100 रन केले की मग मी सेंटरवर जाईन,"असं आईला सांगितलं आणि नेमका सचिन 90 ला आउट झाला, तोपर्यंत 11.05 झालेले.

तोंड लटकवून च  मी त्या दुःखात पेपर दिला. 
ते वयही तसंच होत म्हणा, "उथळ विचार आणि अवखळ कृती".
खूप दुःख झालं मला. आई म्हणाली पण,"अगं त्याचा तोही एक रेकॉर्ड झालाय सगळ्यात जास्ती वेळेस नर्व्हस 90 वर आउट होण्याचा".

मग काय दुःखात आनंद आणि तो साजरा करण्यासाठी आईनी ब्रेडचा कुस्करा केला. आधीही करायची पण त्या दिवशीचा कुस्करा आणि त्याची चव इतकी भन्नाट होती की मी त्या ब्रेडच्या कुस्कर्यावर क्रशच झाली. 
म्हणूनच तेव्हापासून कधीही ब्रेड आणले कि माझ्यासाठी  4 स्लाइस अलग काढून ठेवते आणि त्याचा कुस्करा करते.  After all तो माझा ब्रेड स्लाईसवरचा पहिला क्रश आहे. म्हणून तर नाव देखील तसंच दिलेय.
तुम्हीही करून बघा नक्कीच आवडेल आणि तुम्ही पण क्रश व्हाल.

कमी तेलात असल्याने डाएट वाले पण खाऊ शकतात. मधुमेही देखील एखाद्या वेळेस नाश्त्याला घेऊ शकतात. फक्त wheat ब्रेड वापरा.

साहित्य :
ब्राऊन ब्रेड स्लाइस 6, बारीक चिरलेला कांदा 1, बारीक चिरलेली कोथिंबीर 1/2 वाटी , मोहरी, जिरे , हळद प्रत्येकी 1/2 चमचा, तिखट आवडीनुसार, हिंग आवडीनुसार, आवडत असल्यास शेंगदाणे 1/2 वाटी ,मीठ चवीनुसार, साखर 1 चिमूट चवीला, बारीक गोल चिरलेली मिरची 2, तेल 1 पळी.

कृती :
प्रथम ब्रेड स्लाइस हातानी बारीक कुस्करून घ्या. त्यावर हळद,तिखट, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. कढईत मंद आचेवर हिंग, हिरवी मिरची काप टाका. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या. शेंगदाणे टाका. नंतर त्यात ब्रेड चा तयार कच्चा कुस्करा टाकून वरून चवीला साखर टाका आणि नीट परतून मिक्स करा . झाकण ठेवून दणदणीत वाफ आल्यावर वरून कोथिंबीर आणि गोडालिंबाची कोवळी पाने टाकून गार्निशिंग पूर्ण करा. 
आवडत्या चिली-टोमॅटो सॉस अथवा दही तिखटाच्या चटणी बरोबर गरमागरम खायला द्या.

Monday 18 June 2018

Simple Short Meyo Sandwich

Simple Short Meyo Sandwich



#शाळेचा पहिला दिवस

नवीन दप्तर 🎒, नवीन टिफिन, नवीन वॉटरबॅग, नवीन वर्ग🏫, नवीन टीचर👩 नवीन पुस्तक 📕📖📚आणि नवीन पुस्तकांचा तो धुंद करणारा सुगंध.
सगळं सगळं पुन्हा अनुभवतेय मी माझ्या मुलाच्या रुपात. त्यालासुद्धा खूप आवडतो नवीन पुस्तकांचा सुवास अगदी माझ्याच सारखा.

" अगं चिमे आवरलं का तुझं ? भरलं का सगळं दप्तर वेळापत्रकानुसार? बंड्या उठ रे बाबा आता सुट्ट्या संम्पल्या शाळा सुरु झाली आजपासून."

"अहो तुम्ही पण आटपा बरं आंघोळ करा लवकर. पोरांना शाळेत नेऊन सोडायचयं आपल्याला. व्हॅन वाला शाळेतून घरी आणून सोडणार आहे मग त्यांना. आणि तो ओला टॉवेल बेडवर नका बरं टाकू 😣"

"ए आईssss मला पहिल्याच दिवशी पोळी भाजी नकोय टिफिन मध्ये, चटपटीत दे काहीतरी , " असे काहीसे  सुखद संवादिक भांडण साधारण सर्वच घरांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी दिसून येते.

माझं घर पण या सगळ्या गोष्टींना अजिबात अपवाद नाहीये.

आमच्या बाहुबली ला आज शाळेच्या पहिल्या दिवशी टिफिन मध्ये स्वतः बनवलेले सँडविच न्यायचे होते. मग पठ्ठयानी अलार्म न लावता व मी न उठवता 7 वाजता जागा होऊन अगदी उत्साहाने सगळी तयारी केली आणि सँडविच बनवले.

 म्हणाला," मी सगळ्यांना share करणार आहे आणि टीचर ला पण सांगणार माझ्या सुपर आई नी शिकवलं आहे मला. आणि सुट्टीत मी फायरलेस cooking शिकला म्हणून".

" सुपर आई"  हे मात्र नवीनच होत मला. मी विचारलं, "सुपर आई", का बर म्हणाला ?तर म्हणतो कसा," तुला सगळं माहित आहे मला आणि बाबाला तू सगळ्या questions ची answers देते न आम्ही विचारलेल्या म्हणून तू सुपर आई".

 पाणी आलं हो डोळ्यात . खरच तर बोलला तो प्रत्येक लेकरासाठी त्याची आई सुपर आईच असते.

निघतांना न सांगता देवाला नमस्कार केला आणि चांगली बुद्धी दे म्हणाला . छान वाटलं, "पोरग सुधारल", म्हणाले हे 😂

गेलो मग शाळेत सोडायला. वाटलं होतं रडेल😢 म्हणून मग मी समजूत घालेल 😊 पण झालं उलटंच सगळी पाखरे  किलबिलाट करून एकमेकांना भेटली. रडारड नाही की गोंधळ नाही आणि चक्क हात हलवून हसत हसत 😃बाय बाय✋ करत गेले पण वर्गात.

 मी आपली आ वासून बघतच राहिली . खरच आहे आजकालची पिढी खूपच हुशार ( चांगल्या अर्थाने )आणि प्रॅक्टिकल आहे.

नाहीतर मी किती गोंधळ घातला होता शाळेत जातांना बापरे जणू मी सावत्र मुलगी आहे आणि आई बाबा  मला कैदखान्यात नेत आहे असेच वाटले होते तेव्हा.

असो झालं पुन्हा रुटीन सुरु ....☺ तुमच्या साठी माझ्या बाहुबली नि बनवलेलं सँडविच पाठवतेय🙏


  • साहित्य :

ब्राऊन ब्रेड ४, मेयॉनीज, टमाटा १, कांदा १, चीझ स्लाइस २, टोमॅटो सॉस २ चमचे, काकडी १ गोल कापून. लेट्युस ची पाने २, पिझ्झा स्पाईस मिक्स १ चमचा


  • कृती : 

ब्राऊन ब्रेड चे चार स्लाइस घेऊन त्याला तुमच्या आवडीचे मेयॉनीज लावून घ्या. त्यावर पिझ्झा स्पाईस मिक्स टाका. कांदा, टमाटा, काकडी आणि आवडत असल्यास लेट्युस ची पाने पसरवून घ्या. त्यावर टोमॅटो सॉस टाकून वरून चीझ स्लाइसचे तुकडे ठेवा आणि एकमेकांवर पूर्ण तयार ब्रेड ठेऊन खायला द्या.  













Mumbai cha Vdapav


#आमचीsssssमुंबई

 


"काय हे मुंबईत आलीस आणि मुंबईचा वडापाव नाही खाल्लास," मग तू कसली ग खादाडी ? असं माझं मन मलाच खात होत कालपासुन 😢 पण करणार काय इलाज नव्हता. कारणही तसंच होत.

आत्तापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच मी मुंबईत आली अबाबो ! किती उंच इमारती डोक्यावरची टोपी नक्कीच खाली पडली असती 👍, सगळीकडे उड्डाणपुलांचे जाळे, सतत धावपळ करणारी माणसे, जवळून भुर्रर्कन जाणारी वाहने हे सगळं मी पहिल्यांदाच दूरचित्रवाणी सोडून  प्रत्यक्ष अनुभवत होती.

 स्वागताला म्हणायला 10 मिनिटांचा धो धो पाऊस व ट्रॅफिक जाम नंतर पुन्हा सगळं सुरळीत सुरु. शेवटी पोहोचलो बाबा निश्चित स्थळी पश्चिम विक्रोळी ला, गोदरेज कंपनीच्या रेसिडेंशील वसाहतीत 🙂 .

पहाताच क्षणी डोळ्यांना दिसणारी सुंदर हिरवाई, अधूनमधून लपाछपी खेळणारा उनाड आणि द्वाड पाऊस, शिस्तीने परेड करणारी अशोकाची, जांभळाची  कडुलिंबाची, बुचाची इ. झाडे. बघून मन टवटवीत झाल्यासारखे वाटले. संध्याकाळमुळे जेवढे दिसले ते पण मनाला आनंदून गेले. संपूर्ण घरांची वसाहात गर्द झाडींनी वेढलेली आहे. जणू काही एखाद्या हिल स्टेशन वरच्या रिसॉर्ट मधेच आलोय असं वाटत होत.

रात्री काकूंच्या हातच गरमागरम जेवण करून मस्त झोप लागली. सकाळी जाग आली तीच मुळी पोपट, कावळे, मैना, साळुंख्या, चिमण्या यांच्या किलबिलाटांनी . 

" पहाटे लाही जाग यावी, इवली किलबिल कानी पडावी।      थंडीची चादर ओढून, पाऊस येतो गिरक्या मारून ।।

जणू म्हणत असावेत," उठा हो पाहुणे सकाळ झाली". पावसाचा लपंडावचा खेळ सुरूच झाला जणू रात्रीपुरती time plz घेतली होती. सगळं छान चालू होत.

 पण मला मात्र मुंबई किंग वडापाव ची खूपच आठवण येत होती😢

"काश मेरे पास जिनी होता तो मेरी ख्वाहिश," जो हुक्म मेरे आका", म्हणताच पूर्ण झाली असती. " असो माझ्या "हक्काचा जिनी" तर झोपला होता😛

पण झाली बाई इच्छा पूर्ण 😁राहवलं नाही मला शेवटी म्हंटल दिरांना , "मला मुंबईचा वडापाव खायचा आहे". मग काय आणला त्यांनी😊. 

माझ्यासाठी तर, "आनंदीआनंद गडे जिकडेतिकडे वडापावच दिसे". असे झाले होते.

अहाहा काय वर्णावे ते रुपडे लोभस, गुबगुबीत सोनेरी कांती, भरीव मुद्रा तीसुद्धा लुसलुशीत आणि मऊ पांढऱ्याशुभ्र आसनावर विराजमान झालेली. राजाला नजर नको लागायला, म्हणून पुदिना,कोथिंबीर,आलं, लसूण आणि लाल तिखटाची चटणी " तीट "म्हणून .😊

डोईवर तळलेल्या हिरव्या मिरचीचा, मिठाच्या खड्यांनी सजवलेला जणू हिरेजडित मुकुटच. तो तर त्याच्या बादशाहीपणा ची साक्षच देत होता.
त्यातून येणाऱ्या सुगंधापुढे तर जगातील सर्वात महागडे आणि सुवासिक अत्तर देखील मला फिके वाटते.

असो तर झाली आमची सुवर्णभेट तोही अगदी मुंबईतुन प्रयाण करण्याच्या आधी सुवर्णमध्य गाठून. 

अच्छा तर गुड बाय मुंबईकर✋ नमस्कार तुमच्या ट्रॅफिक मधील परीक्षा बघणाऱ्या संयमाला 🙏 आणि माझा लाडका खाद्यपदार्थांचा बादशहा प्रिय वडापाव मिस you😢 तुला.

सौ. मधुरा देशपांडे ( एक पोटातून वडापाव प्रेमी )