Monday 23 July 2018

Bharleli Simla Dhabbu Mirchi

भरलेली सिमला ढब्बू मिरची 

साहित्य: 
५ ते ६ गोल आकारची ढब्बू सिमला मिरची आतून बिया काढलेली, हळद १/२ चमचा, तिखट २ चमचे, जिरे १ चमचा, मीठ चवीनुसार, धणेपूड, बेसन दीड वाटी, तेल ३ वाटी आवश्यकतेनुसार 

कृती: 
सिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यातील बिया आणि देठ काढून घ्या. एका मोठ्या वाडग्यात बेसन घेऊन त्यात तिखट, हळद ,मीठ, धणेपूड आणि जिरे टाकून एकत्र करा. 
सर्व मिश्रण एकत्र करत असताना त्यात थोडे थोडे तेल टाकून भिजवत रहा सैलसर झाले कि पोखरलेल्या मिरच्या घेऊन त्यात ते तयार वाटण पूर्णपणे भरून घ्या. 
  
    











आता मंद आचेवर पसरट कढई ठेऊन त्यात २ पळ्या तेल टाकून वाटण भरून तयार केलेल्या मिरच्या त्यावर अलगद नीट अंतरावर ठेवा. झाकण ठेऊन वाफेवर शिजू द्या. अधेमधे झाकण काढून मिरच्या पालटत रहा म्हणजे व्यवस्थित शिजतील. 

साधारण ३० मिनिटांनी बेसन भरलेल्या मिरच्या रंग बदलून पूर्णपणे आतून शिजतील तेव्हा आच बंद करून भाकरी अथवा पोळी बरोबर लिंबू पिळून खायला द्या. 






  

Bread Slice Crush

* ब्रेड_स्लाइस_क्रश् 



'तो अथवा ती, माझा अथवा माझी, पहिला अथवा पहिली "क्रश" आहे यार...'
काय मंडळी दचकलात न मी क्रश म्हणाली म्हणून.  क्रश म्हणजे अजाणतेपणी नकळत झालेले पहिले प्रेम ( म्हणजे असं आपल्याला वाटते ) मग ते कोणाचं कोणावरही असू शकते.

यात फक्त व्यक्तींवरच आपला क्रश होतो असे नाही बरं.
क्रश हा खाण्यावर, एखाद्याच्या लिखाणावर, पदार्था वर, एखाद्याच्या personality वर, गुणांवर, एखाद्या कलाकृतीवर आणि अगदी निर्जीव वस्तूवर सुद्धा हो
ऊ शकतो.
असे क्रश माझ्या आयुष्यात खूप वेळेस आले.

माझा सगळ्यांत पहिला movie क्रश होता मी थिएटर मध्ये बघितलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ)
How romantic जणू काजोल च्या जागी मीच 
क्रिकेट मधला पहिला आणि शेवटचा क्रश जो या जन्मात तरी कधीच पुन्हा होणार नाही तो म्हणजे  'माझा सचिन '.

माझा यासाठी म्हणाली कारण क्रिकेट समजायला लागल्यापासून फक्त आणि फक्त सचिनसाठीच मी क्रिकेट बघायची, त्याच्या फोटो साठी कित्येक वर्तमानपत्र चाळून त्यांना जाळ्या पाडल्यात. 
बारावी च्या परीक्षेला भारत-पाकिस्तान वन डे मॅच होती, 11 वाजता सेंटर वर पोहोचायचं होत, इंग्रजी चा पेपर होता. सचिन 90 वर खेळत होता. "त्यानी लवकर 100 रन केले की मग मी सेंटरवर जाईन,"असं आईला सांगितलं आणि नेमका सचिन 90 ला आउट झाला, तोपर्यंत 11.05 झालेले.

तोंड लटकवून च  मी त्या दुःखात पेपर दिला. 
ते वयही तसंच होत म्हणा, "उथळ विचार आणि अवखळ कृती".
खूप दुःख झालं मला. आई म्हणाली पण,"अगं त्याचा तोही एक रेकॉर्ड झालाय सगळ्यात जास्ती वेळेस नर्व्हस 90 वर आउट होण्याचा".

मग काय दुःखात आनंद आणि तो साजरा करण्यासाठी आईनी ब्रेडचा कुस्करा केला. आधीही करायची पण त्या दिवशीचा कुस्करा आणि त्याची चव इतकी भन्नाट होती की मी त्या ब्रेडच्या कुस्कर्यावर क्रशच झाली. 
म्हणूनच तेव्हापासून कधीही ब्रेड आणले कि माझ्यासाठी  4 स्लाइस अलग काढून ठेवते आणि त्याचा कुस्करा करते.  After all तो माझा ब्रेड स्लाईसवरचा पहिला क्रश आहे. म्हणून तर नाव देखील तसंच दिलेय.
तुम्हीही करून बघा नक्कीच आवडेल आणि तुम्ही पण क्रश व्हाल.

कमी तेलात असल्याने डाएट वाले पण खाऊ शकतात. मधुमेही देखील एखाद्या वेळेस नाश्त्याला घेऊ शकतात. फक्त wheat ब्रेड वापरा.

साहित्य :
ब्राऊन ब्रेड स्लाइस 6, बारीक चिरलेला कांदा 1, बारीक चिरलेली कोथिंबीर 1/2 वाटी , मोहरी, जिरे , हळद प्रत्येकी 1/2 चमचा, तिखट आवडीनुसार, हिंग आवडीनुसार, आवडत असल्यास शेंगदाणे 1/2 वाटी ,मीठ चवीनुसार, साखर 1 चिमूट चवीला, बारीक गोल चिरलेली मिरची 2, तेल 1 पळी.

कृती :
प्रथम ब्रेड स्लाइस हातानी बारीक कुस्करून घ्या. त्यावर हळद,तिखट, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. कढईत मंद आचेवर हिंग, हिरवी मिरची काप टाका. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या. शेंगदाणे टाका. नंतर त्यात ब्रेड चा तयार कच्चा कुस्करा टाकून वरून चवीला साखर टाका आणि नीट परतून मिक्स करा . झाकण ठेवून दणदणीत वाफ आल्यावर वरून कोथिंबीर आणि गोडालिंबाची कोवळी पाने टाकून गार्निशिंग पूर्ण करा. 
आवडत्या चिली-टोमॅटो सॉस अथवा दही तिखटाच्या चटणी बरोबर गरमागरम खायला द्या.

Monday 18 June 2018

Simple Short Meyo Sandwich

Simple Short Meyo Sandwich



#शाळेचा पहिला दिवस

नवीन दप्तर 🎒, नवीन टिफिन, नवीन वॉटरबॅग, नवीन वर्ग🏫, नवीन टीचर👩 नवीन पुस्तक 📕📖📚आणि नवीन पुस्तकांचा तो धुंद करणारा सुगंध.
सगळं सगळं पुन्हा अनुभवतेय मी माझ्या मुलाच्या रुपात. त्यालासुद्धा खूप आवडतो नवीन पुस्तकांचा सुवास अगदी माझ्याच सारखा.

" अगं चिमे आवरलं का तुझं ? भरलं का सगळं दप्तर वेळापत्रकानुसार? बंड्या उठ रे बाबा आता सुट्ट्या संम्पल्या शाळा सुरु झाली आजपासून."

"अहो तुम्ही पण आटपा बरं आंघोळ करा लवकर. पोरांना शाळेत नेऊन सोडायचयं आपल्याला. व्हॅन वाला शाळेतून घरी आणून सोडणार आहे मग त्यांना. आणि तो ओला टॉवेल बेडवर नका बरं टाकू 😣"

"ए आईssss मला पहिल्याच दिवशी पोळी भाजी नकोय टिफिन मध्ये, चटपटीत दे काहीतरी , " असे काहीसे  सुखद संवादिक भांडण साधारण सर्वच घरांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी दिसून येते.

माझं घर पण या सगळ्या गोष्टींना अजिबात अपवाद नाहीये.

आमच्या बाहुबली ला आज शाळेच्या पहिल्या दिवशी टिफिन मध्ये स्वतः बनवलेले सँडविच न्यायचे होते. मग पठ्ठयानी अलार्म न लावता व मी न उठवता 7 वाजता जागा होऊन अगदी उत्साहाने सगळी तयारी केली आणि सँडविच बनवले.

 म्हणाला," मी सगळ्यांना share करणार आहे आणि टीचर ला पण सांगणार माझ्या सुपर आई नी शिकवलं आहे मला. आणि सुट्टीत मी फायरलेस cooking शिकला म्हणून".

" सुपर आई"  हे मात्र नवीनच होत मला. मी विचारलं, "सुपर आई", का बर म्हणाला ?तर म्हणतो कसा," तुला सगळं माहित आहे मला आणि बाबाला तू सगळ्या questions ची answers देते न आम्ही विचारलेल्या म्हणून तू सुपर आई".

 पाणी आलं हो डोळ्यात . खरच तर बोलला तो प्रत्येक लेकरासाठी त्याची आई सुपर आईच असते.

निघतांना न सांगता देवाला नमस्कार केला आणि चांगली बुद्धी दे म्हणाला . छान वाटलं, "पोरग सुधारल", म्हणाले हे 😂

गेलो मग शाळेत सोडायला. वाटलं होतं रडेल😢 म्हणून मग मी समजूत घालेल 😊 पण झालं उलटंच सगळी पाखरे  किलबिलाट करून एकमेकांना भेटली. रडारड नाही की गोंधळ नाही आणि चक्क हात हलवून हसत हसत 😃बाय बाय✋ करत गेले पण वर्गात.

 मी आपली आ वासून बघतच राहिली . खरच आहे आजकालची पिढी खूपच हुशार ( चांगल्या अर्थाने )आणि प्रॅक्टिकल आहे.

नाहीतर मी किती गोंधळ घातला होता शाळेत जातांना बापरे जणू मी सावत्र मुलगी आहे आणि आई बाबा  मला कैदखान्यात नेत आहे असेच वाटले होते तेव्हा.

असो झालं पुन्हा रुटीन सुरु ....☺ तुमच्या साठी माझ्या बाहुबली नि बनवलेलं सँडविच पाठवतेय🙏


  • साहित्य :

ब्राऊन ब्रेड ४, मेयॉनीज, टमाटा १, कांदा १, चीझ स्लाइस २, टोमॅटो सॉस २ चमचे, काकडी १ गोल कापून. लेट्युस ची पाने २, पिझ्झा स्पाईस मिक्स १ चमचा


  • कृती : 

ब्राऊन ब्रेड चे चार स्लाइस घेऊन त्याला तुमच्या आवडीचे मेयॉनीज लावून घ्या. त्यावर पिझ्झा स्पाईस मिक्स टाका. कांदा, टमाटा, काकडी आणि आवडत असल्यास लेट्युस ची पाने पसरवून घ्या. त्यावर टोमॅटो सॉस टाकून वरून चीझ स्लाइसचे तुकडे ठेवा आणि एकमेकांवर पूर्ण तयार ब्रेड ठेऊन खायला द्या.  













Mumbai cha Vdapav


#आमचीsssssमुंबई

 


"काय हे मुंबईत आलीस आणि मुंबईचा वडापाव नाही खाल्लास," मग तू कसली ग खादाडी ? असं माझं मन मलाच खात होत कालपासुन 😢 पण करणार काय इलाज नव्हता. कारणही तसंच होत.

आत्तापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच मी मुंबईत आली अबाबो ! किती उंच इमारती डोक्यावरची टोपी नक्कीच खाली पडली असती 👍, सगळीकडे उड्डाणपुलांचे जाळे, सतत धावपळ करणारी माणसे, जवळून भुर्रर्कन जाणारी वाहने हे सगळं मी पहिल्यांदाच दूरचित्रवाणी सोडून  प्रत्यक्ष अनुभवत होती.

 स्वागताला म्हणायला 10 मिनिटांचा धो धो पाऊस व ट्रॅफिक जाम नंतर पुन्हा सगळं सुरळीत सुरु. शेवटी पोहोचलो बाबा निश्चित स्थळी पश्चिम विक्रोळी ला, गोदरेज कंपनीच्या रेसिडेंशील वसाहतीत 🙂 .

पहाताच क्षणी डोळ्यांना दिसणारी सुंदर हिरवाई, अधूनमधून लपाछपी खेळणारा उनाड आणि द्वाड पाऊस, शिस्तीने परेड करणारी अशोकाची, जांभळाची  कडुलिंबाची, बुचाची इ. झाडे. बघून मन टवटवीत झाल्यासारखे वाटले. संध्याकाळमुळे जेवढे दिसले ते पण मनाला आनंदून गेले. संपूर्ण घरांची वसाहात गर्द झाडींनी वेढलेली आहे. जणू काही एखाद्या हिल स्टेशन वरच्या रिसॉर्ट मधेच आलोय असं वाटत होत.

रात्री काकूंच्या हातच गरमागरम जेवण करून मस्त झोप लागली. सकाळी जाग आली तीच मुळी पोपट, कावळे, मैना, साळुंख्या, चिमण्या यांच्या किलबिलाटांनी . 

" पहाटे लाही जाग यावी, इवली किलबिल कानी पडावी।      थंडीची चादर ओढून, पाऊस येतो गिरक्या मारून ।।

जणू म्हणत असावेत," उठा हो पाहुणे सकाळ झाली". पावसाचा लपंडावचा खेळ सुरूच झाला जणू रात्रीपुरती time plz घेतली होती. सगळं छान चालू होत.

 पण मला मात्र मुंबई किंग वडापाव ची खूपच आठवण येत होती😢

"काश मेरे पास जिनी होता तो मेरी ख्वाहिश," जो हुक्म मेरे आका", म्हणताच पूर्ण झाली असती. " असो माझ्या "हक्काचा जिनी" तर झोपला होता😛

पण झाली बाई इच्छा पूर्ण 😁राहवलं नाही मला शेवटी म्हंटल दिरांना , "मला मुंबईचा वडापाव खायचा आहे". मग काय आणला त्यांनी😊. 

माझ्यासाठी तर, "आनंदीआनंद गडे जिकडेतिकडे वडापावच दिसे". असे झाले होते.

अहाहा काय वर्णावे ते रुपडे लोभस, गुबगुबीत सोनेरी कांती, भरीव मुद्रा तीसुद्धा लुसलुशीत आणि मऊ पांढऱ्याशुभ्र आसनावर विराजमान झालेली. राजाला नजर नको लागायला, म्हणून पुदिना,कोथिंबीर,आलं, लसूण आणि लाल तिखटाची चटणी " तीट "म्हणून .😊

डोईवर तळलेल्या हिरव्या मिरचीचा, मिठाच्या खड्यांनी सजवलेला जणू हिरेजडित मुकुटच. तो तर त्याच्या बादशाहीपणा ची साक्षच देत होता.
त्यातून येणाऱ्या सुगंधापुढे तर जगातील सर्वात महागडे आणि सुवासिक अत्तर देखील मला फिके वाटते.

असो तर झाली आमची सुवर्णभेट तोही अगदी मुंबईतुन प्रयाण करण्याच्या आधी सुवर्णमध्य गाठून. 

अच्छा तर गुड बाय मुंबईकर✋ नमस्कार तुमच्या ट्रॅफिक मधील परीक्षा बघणाऱ्या संयमाला 🙏 आणि माझा लाडका खाद्यपदार्थांचा बादशहा प्रिय वडापाव मिस you😢 तुला.

सौ. मधुरा देशपांडे ( एक पोटातून वडापाव प्रेमी )

Sunday 10 June 2018

Homemade Pan Pizza

होममेड  पिझ्झा 

"जमला ग बाई जमला, मला तव्यावर पिझ्झा जमला ", 💃💃💃💃 चला बुवा जमला पिझ्झा🍕 एकाच प्रयत्नात 😀कसलं भारी वाटतेय म्हणून सांगू 🤗.



आमचं अर्धांग 👨आणि काळजाचा तुकडा👦 फिरायला गेले होते रविवारी दुपारी. ठरल्याप्रमाणे ते दोघे यायच्या आत मला त्यांच्यासाठी 1 पिझ्झा बनवून ठेवायचा असल्याने  पटकन पिझ्झा साठी लागणारे साहित्य मस्तपैकी टेबलावर मांडून त्याचा मनाजोगा फोटो येईपर्यंत चांगले 10 ते 15 मिनिटे फोटोशूट 📸करून घेतले शेवटी मला हवा तसा फोटो मिळाला एकदाचा.

मग आधी एक तयार पिझ्झा बेस घेतला. त्याची सच्छिद्र बाजू वर ठेवून त्यावर "मेयोनिज" चा थर लावला. त्यावर मग "टोमॅटो केचप" लावले. "पिझ्झा मिक्स" मसाला शिंपडला. मग आवडीच्या "भाज्या" कांदा, टमाटर आणि शिमला मिरची पातळ तसेच उभी बारीक चिरून घेतली. मग त्या संपूर्ण पिझ्झा बेसवर पसरवून टाकल्या.वरून "चिली पावडर" आणि थोडीशी "पार्सले" (वाळलेल्या कोथिंबीर सारखी दिसणारी विदेशी कोथिंबीरची पाने) स्प्रिंकल केली. 
त्यावर मग "Go चिझ slice" चे तुकडे तोडून पसरवले. शेवटी "special पिझ्झा चीझ" किसून त्यावर दाट थर दिला. 

पॅन कम कढई मध्ये थोडस "अमूलच हर्बल बटर" लावून गॅस प्रिहीट करून मंद केला आणि तयार पिझ्झा बेस त्यावर अलगद ठेवला आणि 5 मिनिटे झाकण ठेवले. मधून मधून एकदा चेक 🙄 केले शेवटी 5 मिनिटानंतर गॅस बंद केला आणि 3 मिनिटांच्या अंतराने झाकण काढले, तेव्हा वाफेवर संपूर्ण चीझ छान वितळून गेले होते आणि पिझ्झा बेसची खालची बाजू थोडी कुरकुरीत बदामी रंगाची झाली ,आणि हाय झाकण उघडतातच काय घमघमाट सुटला होता म्हणून सांगू. 😌 🤤

तेवढ्यात आमचे दोघे 👨👦आले म्हणाले ,"अरे वा पिझ्झा 'डोमिनोज कि स्मिथ & जोन्स', मी म्हंटल ," काल शिकली मी बिना ओव्हन चा पिझ्झा बनवायला." त्यावर म्हणतात कसे ," माझ्यामुळे शिकली न म्हणून म्हणतो, आता केक पण शिकून घे म्हणजे ओव्हन च कामच नाही. कसं ". 🤦🙏

मग तो पिझ्झा मग ताटलीत 🍽 काढून जाड चाकूने 🔪 चार भागात विभागून अलग केला.10 मिनिटात पूर्ण फस्त. 
माझा उपास असल्याने पिझ्झ्याकडे बघूनच समाधान मानलं 😐 पण आज स्वतः साठी पुन्हा करणार त्यामुळे घरात दोघांना 👨👦 पण आनंद झाला आहे परत खायला मिळणार म्हणून😝. 

*पिझ्झ्यासाठी 🍕लागणारे साहित्य: 

तयार पिझ्झा बेस
मेयोनिज (तुमच्या आवडीनुसार फ़्लेवर घेऊ शकता)
पिझ्झा मिक्स चा मसाला,
पार्सले
चिली पावडर किंवा फ्लेक्स
GO चीझ SLICE
अमूल हर्बल बटर
HOT अँड SPICY मॅगी सॉस
तुमच्या आवडीच्या भाज्या (पातळ उभे काप करून)

*कृती वर लेखात सविस्तर दिली आहे😎

टीप :
1) पिझ्झा कापताना त्याचा कुरुम करूम आवाज आला म्हणजे खालचा भाग व्यवस्थित भाजला गेला आहे असे समजावे. 
2) तुम्ही असेल तर पिझ्झा कटर देखील वापरू शकता. नाहीतर मोठ्या जाड चाकूचा वापर करू शकता. 3)आवडत असल्यास पनीर, मशरूम, black and ग्रीन ऑलिव्ह, अल्यापिनो इ. टोपींग्स घेऊ शकता. 

नुसती साहित्य आणि कृती न देता छोटासा रेसिपी व्हिडिओ तयार केलाय जेणेकरून पिझ्झा कृती अधिक चांगल्या रीतीने समजेल.
साहित्य :

व्हिडीओ :


Friday 4 May 2018

Kairicha Chhunda

कैरीचा छुन्दा  
कैरीचे गोड किसलेले लोणचे

साहित्य:
साल काढून किसलेली हिरवी कैरी ४ वाटी, त्याच्याच बरोबरीने ३ वाटी किसलेला गुळ, तिखट ३ चमचे व आवडीनुसार, मीठ चवीनुसार, जिरेपूड १ चमचा, २ चमचे लवंग पूड 

कृती:
 आदल्या दिवशी कैरी किसून त्यात किसलेला गुळ टाकून ठेवा. दुसर्या दिवशी पसरत भांड्यात अथवा काचेच्या मोठ्या बरणीत भरून वरून स्वच्छ पातळ फडके दुहेरी करून झाकून ८ ते १० दिवस कडक उन्हात ठेवा. म्हणजे त्याला चांगला पाक सुटेल आणि कैरी मुरेल. नंतर तिखट, मीठ, जिरेपूड आणि लवंगपूड कालवून पुन्हा २ दिवस उन्हात ठेवा म्हणजे मिश्रण लवकर एकजीव होते. मला हा छुन्दा करायला आणि पाक सुटायला चान्गले १७ दिवस लागले 

टीप:
हा छुन्दा उपवासालाही चालतो कारण हळद टाकली नाही.  

Wednesday 25 April 2018

Fried Dhokla Cuts

 कुरकुरीत ढोकळा काप 


साहित्य:
ढोकळ्याचे तुकडे २ वाटी, मोहरी १ चमचा, कोथिंबीर सजावटीसाठी, किसलेले ओल खोबर २ चमचे, पिठी साखर १ छोटा चमचा,  तेल १ वाटी आवश्यकतेनुसार, गोडलिंबाची ७ ते ८ कोवळी पाने.   

कृती:
ढोकळा पीठ नेहमीसारखे साधारण घट्टसर भिजवावे आणि इडलीपात्रात १५ मिनिटे इडलीसारखे वाफवून घ्यावे.  थंड झाल्यावर इडलीपात्रातून गोल गोल आकाराचे काढून घ्यावे. नंतर १ गोल कापाचे ४ तुकडे याप्रमाणे तुकडे करून बाजूला काढून ठेवा. 
कढईत १ वाटी तेल गरम करून त्यात मोहरी आणि गोडलिंबाची पाने टाकून तडतडू द्या. थंड  झालेले ढोकळ्याचे काप त्यात कुरकुरीत होईपर्यंत शॉलो फ्राय करा. त्यावर पिठी साखर भुरभुरा. आता सर्व्ह करताना त्यावर किसलेले ओले खोबरे आणि कोथिंबीर टाका. सॉस बरोबर खायला द्या.     














Mango Milk Shake

मँगो मिल्क शेक 

साहित्य :
आंब्याचा रस १ वाटी, पिठी साखर आवश्यकतेनुसार, आंब्याच्या बारीक तुकडे केलेल्या फोडी १/२ वाटी, दूध ४ वाटी 

कृती:आंब्याचा रस मिक्सरमध्ये पिठी साखरेसोबत चांगला मिक्स करून घ्या. नंतर Ice-Trey मध्ये थोडा रस आणि आंब्याच्या तयार बारीक फोडी टाकून त्यांचा Cube तयार करून घ्या. फ्रिज मध्ये Mango Cube set झाले कि मिक्सरमध्ये तयार केलेल्या रसात आवश्यकतेनुसार थंड दूध टाकून पुन्हा मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्या. 
सर्व्ह करतांना काचेच्या ग्लास मध्ये खाली तयार Mango Cube टाकून वरून थंड मिल्क शेक टाका आणि आंब्याच्या फोडींनी डेकोरेट करून थंड थंड प्यायला द्या. 

Sunday 22 April 2018

Chinchech Gulambt Lonch

चिंचेचं गुळाम्बट लोणचं 

  • साहित्य:

बिया काढून सोललेली चिंच १ पाव, तिखट आवडीनुसार १ वाटी, मीठ चवीनुसार, गुळ १/२ kg ( जर गोड आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता ), आमचूर पावडर २ चमचे, चाट मसाला १ चमचा, पाणी आवश्यकतेनुसार. 

  • कृती:

प्रथम सोललेल्या चिंचा एका मोठ्या वाडग्यात घेऊन त्याला पाण्यानी थोडे ओले करा आणि आवश्यकतेनुसार मीठ टाका. कढईत गुळ आणि थोडे पाणी एकत्र कुणी गुळाचा साधारण पातळ पाक तयार करा त्याला उकळी आली कि त्यात चिंच, तिखट, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ टाकून चांगले उकळू द्या. 
१० मिनिटे उकळल्यानंतर त्यात चाट मसाला टाकून आच बंद करा. झाकण ठेऊन चिंच पाकात मुरू द्या. 
थंड झाले कि नुस्त बोटानी खायला तयार आहे चिंचेचे गुळाम्बट लोणचं. 

  • टीप: 

  1. पाकातील लोणचं असल्यामुळे फ्रीज मध्ये न ठेवता वरती काचेच्या बरणीत ठेवलं तरी वर्षभर टिकत.   
  2. पाक न करता पण तुम्ही चिंचेचं लोणचं वरील सर्व साहित्य किसलेल्या गुळाबरोबर मिक्स करून काचेच्या बरणीत भरून कडकडीत उन्हात १५ दिवस ठेऊन सुटलेल्या पाकात मुरू द्या छान अलग चव येते.                                                                                                                                                      












Saturday 21 April 2018

My Style Patodyaachi Bhaji

पातोड्याची भाजी 

पाटोड्यांसाठी साहित्य: 
चणा डाळ पीठ २ वाटी, जिरे २ चमचे, ओवा १ चमचे, मीठ चवीनुसार, तिखट १ चमचा, हळद १/२ चमचा, धणेपूड १ चमचा 


रस्सा साहित्य: 
तांदूळ १/२ वाटी, हरभरा डाळ १/२ वाटी,  तेल फोडणीसाठी, जिरे १ चमचा, धणेपूड २ चमचे, तिखट आवडीनुसार, मीठ चवीनुसार, १ मोठा कांदा, १छोटा टमाटा, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ५ लसूण पाकळ्या, कोथिंबीर सजावटीसाठी, पाणी आवश्यकतेनुसार 

कृती: 
एका भांड्यात चणा पीठ घेऊन त्यात जिरे, ओवा, तिखट, हळद आणि मीठ एकत्र करा थोडेसे तेलाचे मोहन घाला. पाणी टाकून घट्ट मळून घ्यान . नंतर त्याचे छोटे गोळे बनऊन पोळी लाटून घ्या. पोळी लाटल्यानंतर चाकूने तिचे शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे करून घ्या. ते सर्व पेपरवर काढून घ्या. 

पेपरवर काढल्यानंतर इडली पात्रात वाफवून घ्या. 
आता झणझणीत रस्सा अथवा करी करण्यासाठी तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि जिरे कढईत एकत्र खरपूस भाजून घ्या.  मिक्सर मध्ये भाजलेले मिश्रण अगदी बारीक वाटून घ्या. त्यात कांदा, टमाटा आणि हिरवी मिरची,लसूण चे तुकडे करून टाका. सोबतच तिखट, धणेपूड आणि २ चमचे तेल टाकून एकत्र बारीक फिरवून घ्या. खूपच घट्ट वाटल्यास थोडेसे पाणी टाकून पुन्हा फिरवा. मोठ्या वाटीत वाटण काढून घ्या. 
कढईत ३ पळी तेल आणि १/२ चमचा साखर टाकून थोडस जिरे तडतडू द्या. त्यात तयार मिश्रणाचे वाटण टाकून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या. १५ मिनिटानंतर तेल सुटले कि अंदाजे ३ पेले पाणी टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात वाफवलेल्या पाटोड्या टाका. सतत हलवत रहा नाहीतर कढईला लागून येतात साधारण २० मिनिटे मंद आचेवर शिजल्यानंतर खाली काढून कोथिंबिरीने सजवा. गरमागरम भाकरी सोबत खायला द्या पातोड्याची भाजी  

टीप :
         १) वाफवून घेतल्यामुळे पातोडी आतून पण शिजते आणि कच्चीही राहत नाही. 
         २) फोडणी करताना किंचित साखर घातली कि छान तर्री येते. 











Wednesday 18 April 2018

Maharashtrian Crispy Aluwdi

अळूवडी 

साहित्य :
५ ते ६ लाल दांडीच्या अळूची पाने,  आंबट दही २ वाटी, जिरे २ चमचे, ओवा १ चमचा, तिखट २ चमचे, हळद १/२ चमचा, चिंचेचा कोळ २ चमचे, तेलाचं मोहन २ चमचे, बेसन आवश्यकतेनुसार २ वाटी, मीठ चवीनुसार, साखर १/२ चमचा. वड्या तळणीसाठी तेल ४ वाट्या. 
कृती:
लाल अळूची पाने धुवून पुसून घ्या. एका मोठ्या वाडग्यात बेसन, हळद, तिखट, जिरे, ओवा, चिंचेचा कोळ, मीठ आणि साखर एकत्र मिक्स करा. त्यात तेलाचे मोहन घालून धीरेधीरे दही टाका. साधारण भज्यांपेक्षा घट्ट मिश्रण तयार झाले कि ते अळूच्या उलट्या पानांवर व्यवस्थित पसरवून घेऊन त्याची गोलाकार घडी घाला. 
  

आता इडली पात्रात अथवा कुकरमध्ये शिटी न लावता तेलाचा हात भांड्याला लावून त्यावर अळूच्या बेसन लावलेल्या पानांच्या घड्या ठेऊन ३० मिनिटे वाफ काढा.  ३० मिनिटानंतर काढून घ्या आणि फ्रिज मध्ये १५ मिनिटे थंड करायला ठेवा.

थंड झाल्यावर त्यांचे छोटे छोटे काप करून गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून सॉस बरोबर गरमागरम खायला द्या.     










Chinchwani Recipe

चिंचवणी ची रेसिपी 

साहित्य:
बिया काढून सोलून घेतलेल्या १ वाटी चिंचा, तिखट १ चमचा, जिरे १ चमचा, गूळ २ वाटी अथवा आवडीनुसार, तेल फोडणीसाठी, धणेपूड १/२ चमचा, आवडीनुसार काळा व गरम मसाला. ७ ते ८ चारोळ्या, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार 

कृती:
चिंचवणी करण्याच्या आदल्या रात्री सोललेल्या चिंचा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. दुसर्या दिवशी सकाळी त्या चांगल्या पाण्यानी कोळून घ्याव्यात. कढईत तेलाची फोडणी करून त्यात जिरे तडतडल्यावर चिंचेचा कोळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी, तिखट, मसाला,मीठ  आणि गुळ टाकून उकळू द्या. १० ते १५ मिनिटे उकळल्यानंतर आच बंद करून वरून वरून चारोळी टाकून आवडत असल्यास थंड अथवा जेवताना कोमट सर्व्ह करा. 
तुमची चिंचवणी तयार आहे.   

Thursday 12 April 2018

Maharashtra Special Upma Recipe

रवा आणि मूगडाळीचा उपमा 


साहित्य:
बारीक रवा १ मोठी वाटी, पिवळी मुगाची डाळ १/२ छोटी वाटी, १ बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे ९ ते १० तुकडे, १५ ते २० भाजलेले शेंगदाणे, मोहरी १ चमचा, तेल २ पळी, साखर १ चमचा, मीठ चवीनुसार, कढीपत्ता १ कोवळी दांडी 
कृती: 
कढईत तेल तापल्यावर मोहरी टाकून तडतडल्यावर कांदा आणि मिरची तुकडे परतून घ्या. कांदा सोनेरी रंगावर आला कि त्यात मुगाची डाळ टाकून खरपूस लालसर भाजा. शेवटी कढीपत्ता पाने टाकून रवा टाका. चांगला १० मिनिटे परतल्यावर त्यात उकळलेले गरम पाणी अंदाजाने घालत ढवळत रहा. मीठ टाकून चवीला १ चमचा साखर घाला आणि ५ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेऊन शिजू द्या. शिजल्यावर वाफ आल्यानंतर ताटलीत काढून किथिंबीर ने गार्निश करा. सोबत लिंबाचे लोणचे अथवा सॉस द्या.      







   

Wednesday 11 April 2018

Watermelon Cool Testy Drink in Summer

टरबुजाचे थंडगार सरबत 
साहित्य:
१ मध्यम आकाराचे टरबूज, १ चमचा काळीमिरेपूड, २ चमचे काळेमीठ, ३ चमचे शुगर सिरप, ३ पुदिन्यायाची  पाने

कृती:
टरबूजाच्या साधारण फोडी करून घ्या. ज्युसर मधून त्यांचा रस काढा. सोबतच पुदिन्याची पाने मिक्सर मधून वाटून रस काढून त्यात मिक्स करून घ्या. आता चवीनुसार काळेमीठ, काळीमिरपूड आणि शुगर सिरप टाकून थंड करायला फ्रिज मध्ये ठेवा आणि गारगार सर्व्ह करा. 

टीप: 
हॅन्डजूसर ने रस काढताना बिया आपोआप वेगळ्या होतात. त्यामुळे फोडी कापून टाकल्या कि चालते. 


Thursday 5 April 2018

Topi Dosa Recipe

टोपी डोसा रेसिपी 


  • डोसा साहित्य:

तांदूळ ३ वाटी, उडदाची डाळ दीड वाटी, खाण्याचा सोडा १ चमचा, कांद्याचे पापुद्रे (साल) ४ ते ५,मीठ चवीनुसार 

  • डोसा कृती:

तांदूळ आणि उडिद डाळ सकाळी पाण्यात भिजवून ठेवावी. साधारणपणे ७ ते ८ तास भिजवल्यानंतर ते चांगले फुगून वर येतात. रात्री मिक्सर मधून त्यांचे चांगले बारीक वाटण करून घ्यावे. सर्वात पहिले तांदूळ बारीक करावे आणि नंतर उडीद डाळ काढावी. एका मोठ्या भांड्यात दोन्ही वाटण एकत्र करुन एकहाती फिरवत मिक्स करावे नंतर त्यात खाण्याचा सोडा पाण्यात मिक्स करून टाकावा. व्यस्थित एकत्र झालं कि शेवटी त्यावर कांद्याची साल अलगत ठेऊन झाकण ठेवा.  दुसऱ्या दिवशी सकाळी व्यस्थित आंबवलेले आणि फुगून वर आलेले मिश्रणातील कांद्याची साल काढून घ्या आणि नीट फेटून घेऊन आवश्यक वाटल्यास पाणी घालून नेहमीप्रमाणे त्याचे डोसे टाका. छान भाजून निघाल्यावर त्याला थोडासा चाकूने कट मारा आणि टोपीचा आकार द्या. तयार आहे तुमचा टोपी डोसा. 


  • पंचडाळ सांबर साहित्य :  

तूर डाळ २ वाटी, सालाची मूग डाळ १/२ वाटी, मसूर डाळ १/२ वाटी, मुगाची पिवळी डाळ १/२ वाटी, थोडीशी हरभऱ्याची डाळ. १ मोठासा कांदा, २ छोटे टमाटे, एव्हरेस्ट चा सांबर मसाला, तिखट आवडीनुसार, धणेपूड १ चमचा, हळद १/२ चमचा, जिरे १ चमचा, मीठ चवीनुसार, गुळ १ छोटा तुकडा, चिंचेचा कोळ १/२ वाटी, तुमच्या आवडीच्या फळभाज्या बारीक कापलेल्या, गाजर एक छोटा तुकडा, शेवग्याच्या शेंगा ५  ते ६ तुकडे, तेल फोडणीसाठी ३  चमचे, साखर १ छोटा चमचा, हिरव्या मिरचीचे तुकडे ८ ते  १०,  बटर १ तुकडा, कोथिंबीर सजावटीसाठी आणि गोडलिंबाची कोवळी पाने दांडीसहित 


  •  पंचडाळ सांबर कृती:

सर्वप्रथम सर्व डाळी व्यस्थित धुवून कुकरमध्ये तुमच्या आवडीच्या बारीक काप केलेल्या भाज्यांसोबत शिजवून घ्या. त्यात कांदा, टमाटा आणि मिरची सुद्धा टाका म्हणजे एकजिव करणे सोपे जाईल. साधारणपणे  ५ शिट्टयानंतर कुकर बंद करून वाफ दबू द्या. कढईत तेल आणि साखर टाकून तेल तापल्यानंतर त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, टमाटा आणि हिरवी मिरची तुकडे टाकून चांगले परतून घ्या. तिखट, हळद, धणेपूड टाका. आता कुकरमधील शिजवलेले डाळी आणि भाज्यांचे मिश्रण एकजीव करून आवश्यकतेनुसार पाणी टाका व कढईतील फोडणीत हळूहळू सोडा. छान उकळी आली कि त्यात गुळ, चिंचेचा कोळ, अमूल बटर आणि सांबर मसाला टाकून आणखी उकळू द्या. १५ मिनिटे उकळल्यानंतर कोथिंबीर आणि गोडलिंबाचे पान टाका. तुमचा पंचडाळ सांबर तयार. 

  • बटाट्याची भाजी साहित्य: 

३ ते ४ मोठे बटाटे, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची तुकडे ९ ते १०  काप करून, गोडलिंबाची पाने ५ ते ६, हळद १/२ चमचा, आलं १ तुकडा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली १ वाटी, मोहरी १ चमचा, तेल फोडणीसाठी. 

  • कृती:  

कुकरमध्ये बटाटे छोटे काप देऊन उकडून घ्या, कढईत फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरचीचे तुकडे, आलं आणि गोडलिंबची पाने टाकून परतून घ्या. हळद टाकून उकडलेले बटाटे स्मॅश कुरून फोडणीत टाका. भाजी व्यस्थित परतून शिजल्यावर बाजूला काढून ठेवा. 


  • हरभऱ्याच्या डाळीची चटणी :

आंबट दही २ वाटी, हरभऱ्याची भिजवलेली डाळ १ वाटी, तिखट आवडीनुसार, साखर २ चमचे, थोडीशी हळद, फोडणीसाठी तेल आणि जिरे १ चमचा.    

  • कृती:

हरभऱ्याची डाळ मधून बारीक वाटून घ्या. दही चांगले फेटून त्यात ती डाळ  मिक्स करा. एका छोट्या वाडग्यात काढून घ्या. कढईत तेल गरम करून जिरे टाका नंतर थोडे कोमट झाल्यावर त्यात तिखट, हळद, साखर  आणि हिंग टाकून वरून तयार चटणीच्या मिश्रणाला चरचरीत फोडणी घालून कोथिंबीर ने सजवून सर्व्ह करा.                       















Tuesday 27 March 2018

Amrutsari Batata + Paneer Paratha

अमृतसरी बटाटा + पनीर पराठा  


साहित्य:
पराठ्याच्या पारीसाठी - कणिक १ पेला, जिरे १ चमचा, मीठ चवीनुसार, लोणी १/२ वाटी, तेलाचं मोहन २ चमचे, पाणी आवश्यकतेनुसार. 
सारणासाठी - बटाटे ३ मध्यम आकाराचे, पनीर हातानी कुस्करलेले १ वाटी, १ बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची ३, कोथिंबीर २ चमचे , मीठ चवीनुसार, तिखट २ चमचे, हळद १/२ चमचा, जिरे १ चमचा, धणेपूड १/२ चमचा, तेल फोडणीसाठी. 

कृती: 
प्रथम बटाटे कुकरमध्ये नीट उकडून घ्या. थंड झाले कि स्मॅशरने कुस्करून गुठळ्या फोडून घ्या. पनीर हातानी बारिक कुस्करून मऊ करून घ्या . कढईत तेल गरम करन त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची साधारण गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात तिखट, हळद, धणेपूड, मीठ आणि जिरे टाकून पुनः घ्या. कुस्करलेले बटाट्याचे सारण टाकून व्यस्थित मिक्स करून झाकण ठेऊन  आचेवर ५ मिनिटे वाफ येऊ द्या. 

पारीसाठी कणिकेमध्ये मीठ, जिरे आणि तेलाचं मोहन टाकून घट्ट मळून घ्या. १५ मिनिटे झाकून ठेवा. 

सारण थंड झाले कि त्यात पनीर हलक्या हाताने मिक्स करा, जास्त दाबून मिक्स करून नका. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. घट्ट भिजवलेल्या कणकेची पोळी लाटून त्यात सारण भरा, पुरचुंडी चा आकार करून पोलीचे तोंड बंद करा म्हणजे सारण लाटताना बाहेर येणार नाही  आणि हलक्या हाताने पोळी लाटा. तवा गरम करून खाली लोणी टाका व लाटलेला पराठा त्यावर शेकण्यासाठी हळुवार टाका. वरून देखील लोणी लावून वितळू द्या. एक बाजू खरपूस शेकून झाली कि दुसरी शेका मधे मधे लोणी सोडा. 

छान खरपूस भाजल्यावर खाली काढून वरून थोडं लोणी टाकून सॉस बरोबर गरमागरम खायला द्या अमृतसरी बटाटा + पनीर पराठा.         




Sunday 25 March 2018

Tarri Misal in new Twist with Crunchy Bread Toppings

तर्री मिसळ in New Twist with Crunchy Bread Toppings




साहित्य:
२ वाटी भिजवलेली मटकी, उकडलेला बटाटा १ मोठा, कांदा १ बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव १ वाटी, मिक्स तिखट फारसाण १/२ वाटी, चिंचेचा कोळ २ चमचे, तिखट आवडीनुसार, तेल १/२ वाटी, अमूल बटर १/२ वाटी, टमाटा आवडीनुसार १ छोटा बारीक चिरून, मीठ आवश्यकतेनुसार, ब्रेड क्रम्स १ वाटी.  

कृती:
आदल्या रात्री मटकी भिजून मोड आणून घ्यावी. बटाटे उकडून घ्यावे. बटाटे हातानी साधारण स्मॅश करून बाजूला ठेवा. मटकी कुकरमध्ये १ शिटी आणून शिजून घ्या. भाजलेला कांदा आणि आलं वाटून घ्यावे. नंतर तेलाची फोडणी करून घ्यावी त्यात तिखट, चवीला साखर आणि लिंबूरस व मीठ घालावे. नंतर बारीक चिरलेला कांदा, टमाटा, आणि वाटलेला मसाला घालून शिजवलेली मटकी टाकावी. थोडे परतल्यावर उकडून स्मॅश केलेला बटाटा व अंदाजाने २ पेले पाणी घालावे आणि उकळी आल्यावर अमूल बटर टाकावे. चांगले शिजून उकळल्यावर तेलाचा तवंग वर येतो यालाच "तर्री " म्हणतात. वरून थोडी चिंचेचा कोळ घालावा आणि अजुनंच रटरट उकळू द्यावी. 


डिश मध्ये सर्व्ह करताना आधी थोडे तिखट फरसाण घालावे मग चिरलेला बारीक कांदा ,बारीक शेव टाकावी नंतर मिसळ ची तर्री टाकून वरून ब्रेड क्रम्स आणि कोथिंबीर व कांद्याचे उभे काप टाकून गरमागरम खायाला द्यावी. 

टीप: 
मिसळ ची तर्री पाव सोबत पण खाऊ शकता फक्त तेव्हा ब्रेड क्रम्स नका टाकू







       

Friday 23 March 2018

Kairiche Lonche

कैरीचे लोणचे 


साहित्य:
ताज्या टपोऱ्या काळपट कैऱ्या २ किलो, १ वाटी मोहरीची डाळ,१ वाटी लाल तिखट, २ वाट्या मीठ, २ चमचे मेथीदाणे, २ चमचे हिंगपूड चांगल्या वासाची, दीड वाटी गोडेतेल 

कृती:
प्रथम कैऱ्या भरपूर पाण्यात बुडवून स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या. त्याच्या फोडी करून त्याला हळद मीठ झाकून ठेवा. झाकल्यामुळे पाणी सुटते ते पाणी काढून टाका म्हणजे फोडी नरम पडणार नाही. थोड्या तेलात मेथ्या तळून घ्या त्याची बारीक पूड करा. अर्धा हिंग तळून घ्यावा. आता कैरीच्या फोडी, मेथ्यापूड, काढून ठेवलेला हिंग, मोहरीची डाळ, तिखट आणि मीठ एकत्र करून ठेवा. बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या, त्यात तळाशी अर्धी वाटी मीठ पसरवा. त्यावर तयार कैरीचे कालवण लोणचे घाला. वरून गार केलेली तेलाची फोडणी ओता व परत मीठ पसरवा. बरनीचे तोंड पुसून झाकण लावून फडकं बांधा म्हणजे जास्त दिवस टिकेल. दर २ दिवसांनी सतत लोणचं हलवा.

टीप :
 तेल न टाकता हि कैरीचे असे लोणचे वर्षभर टिकते आणि चवही वेगळी लागते.  
   







Kurdaei Ani Shevyaanchi Mix bhaji

कुरडई आणि शेवयांची मिक्स भाजी 

साहित्य: 
कुरडया साधारण ३, शेवया लांब आकाराच्या १०, तेल फोडणीसाठी २ चमचे, पाणी ३ मोठे पेले, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, हळद १/२ चमचा, खाण्याचा ऑरगॅनिक रंग पिवळा १/२ चमचा, जिरेपूड धणेपूड १ चमचा, गरम मसाला आवडीनुसार, बारीक चिरलेला १ कांदा, १ टमाटा, मटार १/२ वाटी,१ गाजर बारीक चिरून, सजावटीसाठी कोथिंबीर, अमूल बटर १ तुकडा. 

कृती: 
एका मोठ्या पातेल्यात ३ पेले पाणी घेऊन चांगले उकळू द्या. मग त्यात कुरडई आणि शेवई न मोडता घाला. त्यामुळे त्या मऊ होतील आणि मॅगी सारख्या लांबीला मोठ्या दिसतील. साधारण १० मिनिटानंतर शिजून तयार झाल्या कि झारनीतून झारुन घ्या आणि पटकन गार पाण्यात टाका म्हणजे एकमेकींना चिकटणार नाही. कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, टमाटा, गाजर टाकून चांगला परतून घ्या. मग मटार टाकून एक वाफ येऊ द्या. सर्व भाज्यांचा रंग बदल झाला कि त्यात तिखट, हळद गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, अमूल बटर टाका, परतल्यावर त्यात गार पाण्यातील कुरडया आणि शेवया आणि १ पेला पाणी टाकून शिजू द्या. सर्वात शेवटी थोड्या २ चमचे पाण्यात खाण्याचा पिवळा रंग मिक्स करून तयार भाजीत घाला. वरून कोथिंबीर टाका. 
पोळीबरोबर गरमागरम खायला द्या फक्त मोठयांना सांगा कुरडई ची भाजी आणि लहानांना सांगा मॅगी आहे म्हणून मग बघा कशी पटापट संपते.           












Saturday 17 March 2018

Sweet Edible Floating Flowers

 पाकातील फुले 


फुलांसाठी  साहित्य:
रवा १ वाटी, ३ ते ४ फूड कलर तुमच्या आवडीचे, पाणी अंदाजाने १/२ वाटीपेक्षाही कमी

एकतारी पाकासाठी साहित्य आणि कृती:
साखर २ वाट्या, पाणी २ वाटी 
एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून मंद आचेवर उकळू द्या. उकळताना सतत चमच्याने हलवत रहा. म्हणजे साखर भांड्याच्या तळाला लागणार नाही. १५ मिनीटांनी थोड्याशा पाकाला चमच्यानी ताटलीत पडून बघा जर पाकाची तार निघाली तर झाला एकतारी पाक. आचेवरून काढून घेऊन थंड करायला ठेवा. 
   
फुलांवरील दवबिंदूसाठी गोळी पाक साहित्य:
साखर २ चमचे, पाणी ४ चमचे
एकतारी पाक तयार झाल्यावर अजून ५ मिनीटांनी पाक उकळला तर त्याची गोळी बंद पाक तयार होतो.  

फुले तयार करण्यासाठी कृती :

प्रथम रवा घट्ट भिजवून घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. त्या गोळ्यांमध्ये  वेगवेगळे फूड कलर थोडे पाणी टाकून मऊ मळून घ्या. तयार रंगीत गोळ्यांचे फुल बनवण्यासाठी आधी पाकळ्या तयार करून मग त्यापासून फुल तयार करून घ्या. मंद आचेवर तेलात तळून बाजूला काढून ठेवा.     


फुले तळल्यावर थंड झाली कि त्यावर तुमच्या आवडीनुसार गोळीबंद पाकाचे थेम्ब टाकुन दवबिंदू तयार करा. एकतारी पाक गार झाला कि त्यात फुले टाकून मुरू द्या. 




पाक मुरल्यावर वाटीत सर्व्ह करा पाकातील फुले.