Monday 23 July 2018

Bharleli Simla Dhabbu Mirchi

भरलेली सिमला ढब्बू मिरची 

साहित्य: 
५ ते ६ गोल आकारची ढब्बू सिमला मिरची आतून बिया काढलेली, हळद १/२ चमचा, तिखट २ चमचे, जिरे १ चमचा, मीठ चवीनुसार, धणेपूड, बेसन दीड वाटी, तेल ३ वाटी आवश्यकतेनुसार 

कृती: 
सिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यातील बिया आणि देठ काढून घ्या. एका मोठ्या वाडग्यात बेसन घेऊन त्यात तिखट, हळद ,मीठ, धणेपूड आणि जिरे टाकून एकत्र करा. 
सर्व मिश्रण एकत्र करत असताना त्यात थोडे थोडे तेल टाकून भिजवत रहा सैलसर झाले कि पोखरलेल्या मिरच्या घेऊन त्यात ते तयार वाटण पूर्णपणे भरून घ्या. 
  
    











आता मंद आचेवर पसरट कढई ठेऊन त्यात २ पळ्या तेल टाकून वाटण भरून तयार केलेल्या मिरच्या त्यावर अलगद नीट अंतरावर ठेवा. झाकण ठेऊन वाफेवर शिजू द्या. अधेमधे झाकण काढून मिरच्या पालटत रहा म्हणजे व्यवस्थित शिजतील. 

साधारण ३० मिनिटांनी बेसन भरलेल्या मिरच्या रंग बदलून पूर्णपणे आतून शिजतील तेव्हा आच बंद करून भाकरी अथवा पोळी बरोबर लिंबू पिळून खायला द्या. 






  

Bread Slice Crush

* ब्रेड_स्लाइस_क्रश् 



'तो अथवा ती, माझा अथवा माझी, पहिला अथवा पहिली "क्रश" आहे यार...'
काय मंडळी दचकलात न मी क्रश म्हणाली म्हणून.  क्रश म्हणजे अजाणतेपणी नकळत झालेले पहिले प्रेम ( म्हणजे असं आपल्याला वाटते ) मग ते कोणाचं कोणावरही असू शकते.

यात फक्त व्यक्तींवरच आपला क्रश होतो असे नाही बरं.
क्रश हा खाण्यावर, एखाद्याच्या लिखाणावर, पदार्था वर, एखाद्याच्या personality वर, गुणांवर, एखाद्या कलाकृतीवर आणि अगदी निर्जीव वस्तूवर सुद्धा हो
ऊ शकतो.
असे क्रश माझ्या आयुष्यात खूप वेळेस आले.

माझा सगळ्यांत पहिला movie क्रश होता मी थिएटर मध्ये बघितलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ)
How romantic जणू काजोल च्या जागी मीच 
क्रिकेट मधला पहिला आणि शेवटचा क्रश जो या जन्मात तरी कधीच पुन्हा होणार नाही तो म्हणजे  'माझा सचिन '.

माझा यासाठी म्हणाली कारण क्रिकेट समजायला लागल्यापासून फक्त आणि फक्त सचिनसाठीच मी क्रिकेट बघायची, त्याच्या फोटो साठी कित्येक वर्तमानपत्र चाळून त्यांना जाळ्या पाडल्यात. 
बारावी च्या परीक्षेला भारत-पाकिस्तान वन डे मॅच होती, 11 वाजता सेंटर वर पोहोचायचं होत, इंग्रजी चा पेपर होता. सचिन 90 वर खेळत होता. "त्यानी लवकर 100 रन केले की मग मी सेंटरवर जाईन,"असं आईला सांगितलं आणि नेमका सचिन 90 ला आउट झाला, तोपर्यंत 11.05 झालेले.

तोंड लटकवून च  मी त्या दुःखात पेपर दिला. 
ते वयही तसंच होत म्हणा, "उथळ विचार आणि अवखळ कृती".
खूप दुःख झालं मला. आई म्हणाली पण,"अगं त्याचा तोही एक रेकॉर्ड झालाय सगळ्यात जास्ती वेळेस नर्व्हस 90 वर आउट होण्याचा".

मग काय दुःखात आनंद आणि तो साजरा करण्यासाठी आईनी ब्रेडचा कुस्करा केला. आधीही करायची पण त्या दिवशीचा कुस्करा आणि त्याची चव इतकी भन्नाट होती की मी त्या ब्रेडच्या कुस्कर्यावर क्रशच झाली. 
म्हणूनच तेव्हापासून कधीही ब्रेड आणले कि माझ्यासाठी  4 स्लाइस अलग काढून ठेवते आणि त्याचा कुस्करा करते.  After all तो माझा ब्रेड स्लाईसवरचा पहिला क्रश आहे. म्हणून तर नाव देखील तसंच दिलेय.
तुम्हीही करून बघा नक्कीच आवडेल आणि तुम्ही पण क्रश व्हाल.

कमी तेलात असल्याने डाएट वाले पण खाऊ शकतात. मधुमेही देखील एखाद्या वेळेस नाश्त्याला घेऊ शकतात. फक्त wheat ब्रेड वापरा.

साहित्य :
ब्राऊन ब्रेड स्लाइस 6, बारीक चिरलेला कांदा 1, बारीक चिरलेली कोथिंबीर 1/2 वाटी , मोहरी, जिरे , हळद प्रत्येकी 1/2 चमचा, तिखट आवडीनुसार, हिंग आवडीनुसार, आवडत असल्यास शेंगदाणे 1/2 वाटी ,मीठ चवीनुसार, साखर 1 चिमूट चवीला, बारीक गोल चिरलेली मिरची 2, तेल 1 पळी.

कृती :
प्रथम ब्रेड स्लाइस हातानी बारीक कुस्करून घ्या. त्यावर हळद,तिखट, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. कढईत मंद आचेवर हिंग, हिरवी मिरची काप टाका. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या. शेंगदाणे टाका. नंतर त्यात ब्रेड चा तयार कच्चा कुस्करा टाकून वरून चवीला साखर टाका आणि नीट परतून मिक्स करा . झाकण ठेवून दणदणीत वाफ आल्यावर वरून कोथिंबीर आणि गोडालिंबाची कोवळी पाने टाकून गार्निशिंग पूर्ण करा. 
आवडत्या चिली-टोमॅटो सॉस अथवा दही तिखटाच्या चटणी बरोबर गरमागरम खायला द्या.