Wednesday 28 February 2018

Kairichaa Methambaa

कैरीचा मेथांबा 

साहित्य :
३ आंबट कैऱ्या, २ चमचे मेथीदाणे, तेल २ चमचे, तिखट २ चमचे, पाणी आवश्यकतेनुसार, गुळ १ वाटी किसलेला. 

कृती:
कैऱ्या धूऊन पुसून घेऊन त्यांचे चौकोनी काप करावे. कोय काढून घ्यावी. तुम्हाला वाटल्यास कैरीचे वरचे साल सोलून घेऊ शकता. गूळ किसून घ्या, म्हणजे उकळताना पटकन विरघळेल. कढईत तेल टाकुन मेथीदाणे लालसर झाले कि कैरीच्या फोडी टाकून परतून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी टाका. उकळताना गूळ हळूहळू मिश्रणात टाका. १५ मिनिटे उकळल्यानंतर गुळाचा पाक सुटून कैरीच्या फोडी नरम होतील, तेव्हा तयार मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर वाडग्यात काढून घ्या. थंड झाल्यावर पोळी बरोबर खायला तयार आहे आंबट गोड मेथांबा.  







Monday 26 February 2018

Kalakand

कलाकंद 

साहित्य:
१ लिटर फाटलेले दूध, आवडीनुसार साखर अंदाजे १ मोठी वाटी, वेलची पावडर १ चमचा, 

कृती: 
फाटलेले दूध एका मोठ्या भांड्यात घेऊन उकळू द्या, उकळत असताना त्यात साखरं टाका आणि एक मोठा डाव ठेवा. दूध उकळताना पाणी उडून जाईल आणि खाली घट्ट पदार्थ शिल्लक असेल तेव्हा फ्रायप्यान मध्ये काढून मंद आचेवर पाक सुटू द्या. रंग बदलल्यावर डिश मध्ये काढून थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर बदाम, काजू चे काप टाकून सर्व करा. 


टीप 
१) दूध उकळताना डाव किंवा बशी दुधाच्या भांड्यात टाकले कि दूध उतू जात नाही. 










Sunday 25 February 2018

Peruchi Bhaji

पेरूची भाजी 



साहित्य : छान पिकलेले 3 पेरू, तिखट आवडीनुसार, गुळ अर्धी वाटी, जिरे १ चमचा, तेल फोडणीसाठी ,मीठ चवीनुसार, पाणी आवश्यक्तेनूसार 












कृती: 
पेरू धुवून घ्या त्याचे छोटे काप करून वाटल्यास बिया काढून घ्या, म्हणजे जेष्ठ व्यक्तींना खाता येईल. 
नंतर कढईत तेल गरम करून जिरे तडतडल्यावर पेरूचे काप टाका. थोडे परतल्यावर आवश्यकतेनुसार पाणी टाका. एक उकळी आल्यानंतर त्यात गूळ टाकून नीट हलवा. झाकण ठेऊन शिजू द्या. २० मिनिटांनी काढून गरमागरम पोळीबरोबर खायला तयार आहे पेरूची भाजी.  







Ice-Cream Shake

Ice-Cream Shake 

 साहित्य:
तुमच्या आवडीचे कोणतेही फळ १ वाटी, थंड दूध ३ते ४ कप, साखर १ चमचा बारीक केलेली, बर्फ़ाचे तुकडे जरुरीनुसार, तुमच्या आवडीचे आईस्क्रीम ३ चमचे. 

कृती:
सर्वात प्रथम फळ धुवून त्याचे साल काढून घ्या आणि छोट्या छोट्या आकारात काप करा, परंतु कोण्याही प्रकारची बी राहणार नाही याची काळजी घ्या. 
सर्व काप आणि दूध, साखर, २ बर्फाचे तुकडे आणि आईस्क्रीम मिक्सर मध्ये छान एकत्र करून घ्या, जोपर्यंत ते क्रीमि आणि सॉफ्ट तसेच स्मूथ होत नाही तोपर्यंत मिक्सर मध्ये फिरवा. 
फिरवल्यानंतर ग्लासमध्ये ओतून वरून आईस्क्रीम आणि फळाचे पातळ काप सजावटीसाठी लावा. तयार आहे तुमच्या आवडीचा आईस्क्रीम शेक.   
टीप:
१)शेक करताना दूध थंड असावे अन्यथा ते फळे टाकल्यावर फाटण्याची अथवा नासण्याची शक्यता असते.  




Thursday 22 February 2018

Yummy & Saucy Square Cuts

Yummy & Saucy Square Cuts 


साहित्य:
रवा २ वाट्या, आंबट ताक ३ वाटी, मीठ चवीनुसार, १ मोठा कांदा, १ मोठा टमाटा, हिरवी मिरची ५ ते ६, तेल आवश्यकतेनुसार, तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड प्रत्येकी १ चमचा. 

कृती: 
एका मोठ्या भांड्यात रवा आणि आंबट ताक एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ आणि २ चमचे तेल टाका. हे मिश्रण १ ते २ तास झाकून ठेवा. कांदा, टमाटा व हिरव्या मिरच्या मिक्सर मधून बारीक करून घ्या.
तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड हे सर्व मसाले एका वाटीत मिक्स करून घ्या. 
नॉन स्टिक तव्यावर किंचित तेल शिंपडून रव्याचे तयार बॅटर जाड उत्तप्याप्रमाणे टाका. वरून मिक्सर मध्ये बारीक केलेले कांदा, टमाटा आणि हिरव्या मिरचीचे वाटण चमच्याने थोडे पसरून घ्या वरून वाटीत तयार केलेले मसाल्यांचे मिश्रण भुरभुरा. सॉस गोलाकार टाका व ५ मिनिटे झाकण ठेऊन मंद आचेवर भाजून घ्या, ५ मिनिटानंतर झाकण काढून हलक्या हाताने उत्तपा पलटून दुसरी बाजू भाजून घ्या. 

खरपूस भाजल्यानंतर त्याला ताटलीत काढून घेऊन थंड झाल्यावर सुरीने चौकनी काप करून चटणी अथवा सॉस बरोबर खायला द्या. 



Wednesday 21 February 2018

Crispy Pocket Bites ( Pudachyaa Wdyaa)

Crispy Pocket Bites 
पुडाच्या वड्या 

साहित्य: (सारणासाठी)-
कोथिंबीर जुडी १ धुवून बारीक चिरलेली, खसखस १/२ वाटी, ओल्या नारळाचा किस १ वाटी, बारीक चिरलेला कांदा १ वाटी  , तिखट आवडीनुसार, साखर १ चमचा, मीठ चवीनुसार, प्रत्येकी १/२ चमचा हळद, धणेपूड, जिरेपूड,

साहित्य: (पारीसाठी)-
१ लांब पेला बेसन(चण्याचं पीठ), १ वाटी कणिक, तेलाचं मोहन २ चमचे, प्रत्येकी १/२ चमचा हळद, धणेपूड, जिरेपूड, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.

कृती :
एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर धुऊन घ्या, त्यात खसखस, नारळाचा किस, कांदा, तिखट, प्रत्येकी १/२ चमचा हळद, धणेपूड, जिरेपूड, १ चमचा तिखट साखर आणि मीठ टाका. सर्व मिश्रण एकजीव करा.

दुसर्या वाडग्यात कणिक आणि बेसन घेऊन त्यात तेलाच मोहन टाका. नंतर प्रत्येकी १/२ चमचा हळद, धणेपूड, जिरेपूड, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन घट्ट मळून घ्या. १० मिनिटे झाकून ठेवल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.


आता या छोट्या छोट्या गोळ्यांची पातळ पुरी लाटून त्याला आतून तेलाचा हात फिरवा व सारण एका सरळ रेषेत भरा.

सारण भरल्यानंतर पुरीच्या कडांना कणिक आणि पाणी एकत्र केलेले मिश्रण लावा. पुरीच्या कडा एकावर एक दुमडून बंद लिफ़ाफ़्याचा (पॉकेटचा) आकार द्या.

कढइत तेल गरम करून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून आवडत्या चटणी अथवा सॉस बरोबर खायला द्या. Crispy Pocket Bites (पुडाच्या वड्या) 














Tuesday 20 February 2018

Spicy Green Chillies With Yogurt Filling

Spicy Green Chillies With Yogurt Filling 
दह्यातील उन्हाळी  मसाला  मिरच्या 
















साहित्य: 
लांबीने मोठ्या व थोड्या जाड तिखट मिरच्या १ पाव, अगदी घट्ट दही गोळा, धणेपूड २ चमचे, जिरेपूड २ चमचे, चिमूटभर हळद आणि आमचूर पावडर, ३ चमचे लिंबाचा रस, 

कृती:
प्रथम मिरच्या स्वच्छ धुऊन पुसून घ्या. मग त्या मधोमध पोट फाडून चिरून घ्या. आतील बिया काढण्याची गरज नाही. नंतर एका वाटीत घट्ट दही गोळा ज्यात अजिबात पाणी नसेल अश्या रीतीने घ्यावा.  त्यावर धणेपूड, जिरेपूड, हळद, आमचूर पावडर आणि  लिंबाचा रस टाकून व्यवस्तिथ  मिक्स करून घेऊन ते मिश्रण आता पोट फाडलेल्या मिर्च्यांमध्ये अगदी पुरेपूर भरून घ्या तसेच वरून देखील थोडेसे आवरण म्हणून हलके लावा. 
चांगल्या कडक उन्हात पूर्ण १५ दिवस खणंग वाळल्यानंतर गरमागरम खिचडी आणि कढी बरोबर खायला द्या. 









Without Bake Short Carrot Cake With Rich Dry fruits

Without Bake Short Carrot Cake With Rich Dry-fruits
 (गाजराच्या  गोड वड्या )


साहित्य : 
१/२ kg लाल गाजर, तूप २ चमचे, वेलची पूड २ छोटे चमचे,  काजू आणि बदाम चे काप १/२ वाटी, साखर २ वाटी, दूध १ कप 

कृती:
प्रथम गाजर धूऊन पुसून घ्या. मग त्याचा किस करून घ्या. मोठ्या कढईत तूप टाकून गरम चांगले गरम झाले कि तो गाजराचा किस त्यात टाकून चांगला परता. साधारण ५ मिनिटांनी २ वाटी साखर घाला व सतत हलवा  हलवत रहा. साखरेचा पाक सुटून आला कि त्यात दूध आणि वेलची पूड घाला. हे मिश्रण सतत हलवत रहा साधारण अर्ध्या तासाने गाजराच्या किसाचा रंग बदलेल आणि मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होऊ लागेल तेव्हा ग्यास बंद करून गोळा ताटलीत काढून फ्रिज मध्ये  थंड होण्यासाठी ठेवा. २ तासांनी हलवा बाहेर काढून तुमच्या आवडत्या आकाराच्या SHAPE मध्ये बदाम आणि काजू काप वरून टाकून सर्व्ह करा.    



Solyaachyaa Kachoryaa

सोल्याच्या कचोऱ्या  





















साहित्य: (सारणासाठी )
तुरीच्या ओल्या शेंगा १/२ kg , लसूण पाकळ्या ८ ते १०, जिरेपूड २ चमचे, धणेपूड २ चमचे, तिखट आवडीनुसार, हळद १ चमचा, मीठ चवीनुसार, १ मोठा कांदा 

साहित्य: (पारीसाठी )
मैदा २ वाटी, जिरे २ चमचे, तेलाचे मोहन २ चमचे, मीठ १ चमचा,पाणी आवश्यकतेनुसार 

कृती :
तुरीच्या शेंगाचे दाणे काढून वाफवून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा ,लसूण बारीक ठेचून घाला ,जिरेपूड, धणेपूड, तिखट,हळद , मीठ टाकून एक वाफ येऊ द्या. मग सर्व मिश्रण मिक्सर मध्ये हल्के हल्के वाटून घ्या. खूप कोरडे वाटल्यास गरम तेल टाका. हे वाटलेले मिश्रण एका ताटलीत काढून थंड होऊ द्या. 
पारीसाठी मैद्यामध्ये जिरे, तेलाचं मोहन,मीठ टाकून घट्ट भिजऊन घ्या. १० मिनिटे तसेच झाकून ठेवा. त्याची छोटी पोळी लाटून त्यात तयार सारण भरा आणि पुरचुंडी बांधून हाताने हळूहळू दाब देत लाटा. कढईत तेल गरम करून खरपूस तळून गरमागरम खायला द्या.        











Monday 19 February 2018

Thode Hatke "Aanandwn Gokhle Mala"

थोडे हटके "आनंदवन - गोखले मळा "


तुमच्या सवडीने आणि अवश्य वाचा नाहीतर एका चांगल्या आणि चविष्ट तसेच फळबागांनी सजलेल्या ठिकाणाच्या माहितीला मुकल्याचे दुःख अस्सल खवयाला नक्कीच होईल😢

ही पोस्ट लिहायला जरा उशीरच झाला म्हणा त्याला कारणही तसेच होते, काल खूप दिवसांनी सर्व कुटुंबकबिल्यासह 👨👩👴👵👲आळंदीला जाण्याचा आणि त्यानिमित्ताने बाहेर जेवण्याचा योग जुळून आला. तर पुण्याहून आळंदी कडे जातांना आमचं लक्ष वेधल गेलं ते " आनंदवन गोखले मळा " या फलकाकडे आणि त्याच्या सभोवताली असणाऱ्या विविध प्रकारच्या फळझाडांनी.🌴🌲🍂
जेवणाची वेळ साधारणपणे सकाळी ९ ते दुपारी ४ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ९ अशी आहे. सुरवातीला आपल्या नजरेस पडतो तो इथला कुपन काउंटर तिथे गेल्यावर माणशी 230 ते 250 रुपये एका ताटाप्रमाणे आपल्याला कुपन घ्यावे लागतात. इथे दर दिवशीचा जेवणाचा मेनू वेगळा असतो, स्वतंत्र मेनूकार्ड देत नाहीत. आणि जेवणाची व्यवस्था पंगतीप्रमाणे केली आहे. म्हणजे वाढपी येऊन ताट वाढतात.🍱🍛 
 त्याच्या शेजारच्या छोटेखाणी दुकानात अतिशय उत्तम रीतीने मांडणी केलेल्या घरगुती पदार्थांची रेलचेल दिसते. यात विक्रीसाठी उपलब्ध असणारे पदार्थ म्हणजे विविध प्रकारच्या चटण्या, पापड साधे आणि उपवासाचे, कैरीचा छुनदा, विविध लोणचे आणि बरंच काही.

आत प्रवेश केल्यावर आपल्या स्वागताला उत्सुक असणारी बदकांची फॅमिली🐤🐥 नजरेत भरते त्यातच भर म्हणून पेरुच्या झाडांची फांद्या एकात एक गुंतून तयार झालेली कमान आपले डोक्यावर पाने पाडत 🍂 स्वागत करते.


 
आतमध्ये गेल्यावर उजवीकडे जेवणाचा चारही बाजूंनी उघडा पण वरून पत्री शेड असणारा हॉल दिसून येतो. त्याच्यासमोर असणारे तुळशीवृंदावन आणि छान छोटीसी रंगीत रांगोळी आपले मन प्रसन्न करते.

हॉलच्या बरोबर समोर विस्तीर्ण असा पसरलेला मळा दिसतो. त्यात पेरू, आंबा, चिक्कू आणि केळीची बाग आहे. पेरूच्या वेड्यावाकड्या आणि जमिनीपासून कमी उंच असणाऱ्या फांद्या बघितल्या की पाय आपसूकच तिकडे वळतात. त्याला बांधलेले झुले आणि टायरच्या झोक्यांकडे मन धावू लागते मग आपण मनाच्या हिंदोळ्यावर झुला घेण्याचा प्रयत्न करतो.येथे झाडांखाली जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या नवारच्या आणि नारळाच्या काथ्यापासून तयार केलेल्या बाजी किंवा खाटा बघितल्या की खाल्ल्यावर मस्त ताणून देण्याची 😴इच्छा झाली तर नवलच.


अरे हो जेवणाबद्दल सांगायचेच राहिले तर रविवार असल्यामुळे जेवणाच्या ताटात सुरवातीला गरम ज्वारीची चुलीवरची भाकरी आणि त्यावर मोठ्ठा लोण्याचा गोळा 😌 वाढण्यात आला. उजव्या बाजूस झणझणीत वांगे बटाट्याची मसालेदार भाजी 😍, मटकीची तर्रीदार उसळ😋, पिवळीधम्म कढी🤗, आणि गोडूले गुलाबजाम 😇 देण्यात आले होते. तर डाव्या बाजूला तोंडी लावायला शेंगदाणे आणि लाल मिरची ची ओली चटणी किसलेल्या लिंबाचे आंबटगोड लोणचे 😉 विविध प्रकारचे पापड, पालकाचे हिरवेगार भजे 😚 आणि कांद्याचे काप लिंबाची चतकोर फोड वाढण्यात आली, आणि श्रीकृष्णाने वर्णन केल्याप्रमाणे मिठाच्या वाढणीने सर्व जेवणाला स्वर्गीय  चव आली. जेवण्याची सांगता गरमागरम खिचडीने झाली 😊

 इतकं सगळं कसं अगदी पद्धतशीरपणे आणि आनंदाने भरपेट खाल्ल्यानंतर पंचइंद्रिये अगदी तृप्त झाली तर पोटानी मोठा ढेकर देऊन त्या जेवणाला जणू पोचपावतीच दिली. "अन्न हे परब्रह्म" असल्याने संपूर्ण ताट स्वच्छ करूनच पानावरुन उठलो.

 लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे घसरगुंडी, पाळणे, झुले आणि बंगया देखील आहे. तुम्ही सुद्धा मनसोक्त मळ्यात भटकण्याची हौस पूर्ण करू शकता कारण तुम्हाला अडवणारे इथे कोणीही नसते.
लिहिण्याच्या sorry टायपिंग च्या नादात पहिल्यांदाच इतकं मोठं लिखाण झाले त्याबद्दल क्षमा असावी 🙏
आणि हो अजून एक खास आपल्या सर्वांसाठी फोटो स्वतः काढून इथे टाकण्यात आले आहे म्हणून माझे नाव संक्षिप्त रुपात लिहिले आहे याची नोंद घ्यावी.
चला मग कळवा आपला अनुभव "आनंदवन गोखले मळ्याचा" धन्यवाद. पत्ता फोटोमध्ये दिला आहे.




Saturday 17 February 2018

Lasunache Mix Lonche

लसणाचे मिक्स लोणचे 



साहित्य:
मोठ्या पाकळीचा लसूण १ पाव, तेल २ वाटी, तुमच्या आवडीचा तयार लोणचे मसाला ५० ग्राम, आवश्यकतेनुसार मीठ, २ वाट्या कोणतेही मिक्स लोणचे. 

कृती: 
मोठ्या पाकळीचा लसूण सोलून घ्या. कढईत तेल गरम करून थंड करून घ्या. वाडग्यात लसूण आणि तयार लोणचे मसाला एकत्र करा आवश्यकतेनुसार मीठ टाका नंतर थंड झालेले तेल टाकून लोणचे एकत्र मिक्स करा. तुमच्या आवडीनुसार त्यात तुम्ही मिक्स लोणचे टाका. लसुणाच्या लोणच्याची  चव जिभेवर चांगली रेंगाळते.   

टीप :
कोणत्याही प्रकारचे लोणचे घालतांना त्यात जर तेल जास्त असले तर खूप दिवस टिकते. 










Bhokar che Lonche

भोकराचे लोणचे 
उन्हाळ्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात भोकराचे फळ बाजारात आलेले दिसून येतात बर्याच जणींनी ते बघितले असतील पण त्याचे लोणचे कसे घालायचे ते माहित नसते त्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा उपयोग होईल.  



















साहित्य:
१/२ किलो भोकरे, १ किलो किसलेली आंबट कैरी, तुमच्या आवडीचा लोणचे मसाला, मीठ १ पाव किंवा आवश्यकतेनुसार, फोडणीसाठी तेल  आवशक्यतेनुसार 

कृती:
भोकरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. दुसर्या दिवशी कोरड्या फडक्याने वरून स्वच्छ पुसून घावी. नंतर भोकरे मधून फोडून घेऊन त्यातील बी काढून टाकून आतून पुसून घ्यावी. आतला चिकट द्रव निघून जातो. आता कैरी किसून त्यात भोकराच्या फोडी एकत्र कराव्या. नंतर तुमच्या आवडीचा तयार लोणचे मसाला घेऊन त्यावर व्यस्थित पसरावा. सर्व लोणचे नीट एकत्र करावे आवश्यकतेनुसार मीठ चव घेत घेत टाकावे. शेवटी तेल चांगले गरम करून थंड झाल्यावर लोणच्यावर टाकून  मिक्स करावे. 
खाण्यासाठी तयार आहे भोकराचे चविष्ट लोणचे.  

टीप:
भोकराचे लोणचे शक्यतो कैरीसोबतच एकत्र करावे म्हणजे त्यातील चिकटपणा कमी होतो.   












Dagdi Pohyanchaa Kacchaa Chivda

दगडी पोह्यांचा कच्चा चिवडा 
हा नाश्ता प्रकार तुम्ही ऐनवेळी येणाऱ्या पाहुण्यांना देखील आवडीने करून देऊ शकता.   

साहित्य:
३ वाटी दगडी पोहे, १ बारीक चिरलेला कांदा, १/२ वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, ३ चमचे शेंगदाणे, २ चमचे फुटाणे, २ चमचे बारीक शेव, १ मोठी पळी तेल, मिक्स लोणचे २ चमचे. 

कृती:
एका वाडग्यात दगडी पोहे घेऊन त्यात चिरलेला कांदा,कोथिंबीर, शेंगदाणे, फुटाणे, तिखट आणि तेल एकत्र करावे. शेवटी मिक्स लोणचे टाकून व्यस्थित हलवावे. चवीला थोडीशी साखर टाकावी. सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि शेव टाकावी. 

टीप:
पोहे जर ओलसर अथवा चिम्मट असतील तर थोडेसे गरम करून घ्यावे. 






Mix Pithaachyaa Chakolyaa

मिक्स पिठाच्या चकोल्या


साहित्य:
२ वाटी गव्हाचं पीठ, १/२ वाटी बेसन पीठ, १ वाटी मिश्र धान्य पीठ, १/२ चमचा हळद, तिखट आवडीनुसार, आलं लसूण पेस्ट १ चमचा, साखर आणि मीठ चवीनुसार, तेलाचं मोहन २ चमचे, २ चमचे तीळ, १ चमचा  जिरे, १/२ चमचा ओवा, १/२ चमचा हिंग, आणि पाणी आवश्यकतेनुसार. 

कृती:
 कणिक, बेसन आणि मिश्र पिठात तिखट,हळद, जिरे,ओवा, तीळ, आलं लसूण पेस्ट, हिंग,मीठ आणि तेलाचं मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावे. नंतर लांब लांब दोरीप्रमाणे ताणून तुकडे कापावे आणि आवडीचा आकार द्यावा. १० मिनिटे शिटी न लावता कुकरमध्ये वाफवून घ्यावे. मग तुरीच्या वरणाला खमंग फोडणी देऊन छान उकली आली कि त्यात तुकडे सोडावे. अंदाजे २० मिनिटानंतर वरणात शिजल्यावर गरम गरम चिकोल्या सर्व्ह कराव्या. वरून सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

टीप:
कुकरमध्ये चिकोल्या वाफवल्यामुळे त्या आतून पूर्णपणे शिजायला मदत होते आणि वरणात सोडल्या तरी शिजताना एकमेकींना चिकटत नाही. 








Friday 16 February 2018

Zatpat Mirchi Lonche

झटपट मिरची लोणचे 


  • साहित्य :

१ पाव हिरव्या  मिरच्या, अर्धी वाटी मोहरीची डाळ, मीठ अंदाजानुसार, लिंबाचा रस १ वाटी, हिंग १ मोठा चमचा, मोहरी १/२ चमचा, तेल साधारण दीड वाटी. 

  • कृती :

हिरव्या मिरच्या चांगल्या धूऊन पुसून घ्या. त्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. वाडग्यात अंदाजे मीठ घेऊन त्यात ते तयार मिरचीचे तुकडे घाला. मग तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि मोहरीची डाळ टाका. तेल साधारणपणे कोमट झाले कि तयार तुकड्यांच्या मिश्रणावर हळूहळू टाका आणि हलक्या हाताने मिश्रण एकत्र करा. पूर्णपणे लोणचं गार झाल कि सर्वात शेवटी लिंबाचा रस टाकून लोणचं ह्लवा . तयार झाले झटपट मिरची चे लोणचे. 

  • टीप :

 मिरचीच्या लोणच्यात तेल आणि मसाला गरम असताना लिंबाचा रस टाकू नये, तसे केले तर लोणचे नासण्याची शक्यता असते. 

Thursday 15 February 2018

Crispy Bhindi With Tangy Twist

क्रिस्पी भेंडी With Tangy Twist Coconut


साहित्य
/ किलो कोवळी भेंडी, २ पळी तेल, मोहरी,जिरे १ चमचा, हिंग १ छोटा चमचा, १/२ चमचा हळद, तिखट आवडीनुसार,५ ते ७ कढीपत्ता पाने, ३ आमसूल पाकळ्या,लसूण ५ ते ६ पाकळ्या, चवीपुरते मीठ, ताजा ओला नारळ किस ५ चमचे    

कृती:

भेंडी स्वच्छ धुवूनसुती कपड्याने पुसून कोरडी करून घ्यावी.  साधारणपणे एका भेंडीचे ३ तुकडे  उभे काप करावे. नंतर कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता, ठेचलेला लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी. चिरलेले भेंडीचे काप फोडणीस घालावेमंद आचेवरच भेंडी परतावी. थोडे झाकण ठेवावे मग भेंडीला तार सुटले कि लगेच आमसुलं घाला आणि परता.चवीपुरते मीठ घाला. भाजी शिजल्यावर त्यात ओला नारळ घालून मिनीटे परता. सजावट करताना कांदा आणि टमाटा गोल चिरून घ्या. तयार आहे तुमची भेंडीची जरा हटके ओल खोबर घातलेली भाजी. 

टीप
१) भेंडी ची भाजी करताना मीठ सगळ्यात शेवटी घाला कारण भेंडी शिजून कमी होते,त्यामुळे जर मिठाचा अंदाज चुकला तर खारट होण्याची शक्यता असते. 
२) जर लोखंडी कढईत भेंडीची भाजी केली तर भाजीला तार सुटत नाही आणि चिकट पण होत नाही.