Tuesday 27 March 2018

Amrutsari Batata + Paneer Paratha

अमृतसरी बटाटा + पनीर पराठा  


साहित्य:
पराठ्याच्या पारीसाठी - कणिक १ पेला, जिरे १ चमचा, मीठ चवीनुसार, लोणी १/२ वाटी, तेलाचं मोहन २ चमचे, पाणी आवश्यकतेनुसार. 
सारणासाठी - बटाटे ३ मध्यम आकाराचे, पनीर हातानी कुस्करलेले १ वाटी, १ बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची ३, कोथिंबीर २ चमचे , मीठ चवीनुसार, तिखट २ चमचे, हळद १/२ चमचा, जिरे १ चमचा, धणेपूड १/२ चमचा, तेल फोडणीसाठी. 

कृती: 
प्रथम बटाटे कुकरमध्ये नीट उकडून घ्या. थंड झाले कि स्मॅशरने कुस्करून गुठळ्या फोडून घ्या. पनीर हातानी बारिक कुस्करून मऊ करून घ्या . कढईत तेल गरम करन त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची साधारण गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात तिखट, हळद, धणेपूड, मीठ आणि जिरे टाकून पुनः घ्या. कुस्करलेले बटाट्याचे सारण टाकून व्यस्थित मिक्स करून झाकण ठेऊन  आचेवर ५ मिनिटे वाफ येऊ द्या. 

पारीसाठी कणिकेमध्ये मीठ, जिरे आणि तेलाचं मोहन टाकून घट्ट मळून घ्या. १५ मिनिटे झाकून ठेवा. 

सारण थंड झाले कि त्यात पनीर हलक्या हाताने मिक्स करा, जास्त दाबून मिक्स करून नका. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. घट्ट भिजवलेल्या कणकेची पोळी लाटून त्यात सारण भरा, पुरचुंडी चा आकार करून पोलीचे तोंड बंद करा म्हणजे सारण लाटताना बाहेर येणार नाही  आणि हलक्या हाताने पोळी लाटा. तवा गरम करून खाली लोणी टाका व लाटलेला पराठा त्यावर शेकण्यासाठी हळुवार टाका. वरून देखील लोणी लावून वितळू द्या. एक बाजू खरपूस शेकून झाली कि दुसरी शेका मधे मधे लोणी सोडा. 

छान खरपूस भाजल्यावर खाली काढून वरून थोडं लोणी टाकून सॉस बरोबर गरमागरम खायला द्या अमृतसरी बटाटा + पनीर पराठा.         




Sunday 25 March 2018

Tarri Misal in new Twist with Crunchy Bread Toppings

तर्री मिसळ in New Twist with Crunchy Bread Toppings




साहित्य:
२ वाटी भिजवलेली मटकी, उकडलेला बटाटा १ मोठा, कांदा १ बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव १ वाटी, मिक्स तिखट फारसाण १/२ वाटी, चिंचेचा कोळ २ चमचे, तिखट आवडीनुसार, तेल १/२ वाटी, अमूल बटर १/२ वाटी, टमाटा आवडीनुसार १ छोटा बारीक चिरून, मीठ आवश्यकतेनुसार, ब्रेड क्रम्स १ वाटी.  

कृती:
आदल्या रात्री मटकी भिजून मोड आणून घ्यावी. बटाटे उकडून घ्यावे. बटाटे हातानी साधारण स्मॅश करून बाजूला ठेवा. मटकी कुकरमध्ये १ शिटी आणून शिजून घ्या. भाजलेला कांदा आणि आलं वाटून घ्यावे. नंतर तेलाची फोडणी करून घ्यावी त्यात तिखट, चवीला साखर आणि लिंबूरस व मीठ घालावे. नंतर बारीक चिरलेला कांदा, टमाटा, आणि वाटलेला मसाला घालून शिजवलेली मटकी टाकावी. थोडे परतल्यावर उकडून स्मॅश केलेला बटाटा व अंदाजाने २ पेले पाणी घालावे आणि उकळी आल्यावर अमूल बटर टाकावे. चांगले शिजून उकळल्यावर तेलाचा तवंग वर येतो यालाच "तर्री " म्हणतात. वरून थोडी चिंचेचा कोळ घालावा आणि अजुनंच रटरट उकळू द्यावी. 


डिश मध्ये सर्व्ह करताना आधी थोडे तिखट फरसाण घालावे मग चिरलेला बारीक कांदा ,बारीक शेव टाकावी नंतर मिसळ ची तर्री टाकून वरून ब्रेड क्रम्स आणि कोथिंबीर व कांद्याचे उभे काप टाकून गरमागरम खायाला द्यावी. 

टीप: 
मिसळ ची तर्री पाव सोबत पण खाऊ शकता फक्त तेव्हा ब्रेड क्रम्स नका टाकू







       

Friday 23 March 2018

Kairiche Lonche

कैरीचे लोणचे 


साहित्य:
ताज्या टपोऱ्या काळपट कैऱ्या २ किलो, १ वाटी मोहरीची डाळ,१ वाटी लाल तिखट, २ वाट्या मीठ, २ चमचे मेथीदाणे, २ चमचे हिंगपूड चांगल्या वासाची, दीड वाटी गोडेतेल 

कृती:
प्रथम कैऱ्या भरपूर पाण्यात बुडवून स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या. त्याच्या फोडी करून त्याला हळद मीठ झाकून ठेवा. झाकल्यामुळे पाणी सुटते ते पाणी काढून टाका म्हणजे फोडी नरम पडणार नाही. थोड्या तेलात मेथ्या तळून घ्या त्याची बारीक पूड करा. अर्धा हिंग तळून घ्यावा. आता कैरीच्या फोडी, मेथ्यापूड, काढून ठेवलेला हिंग, मोहरीची डाळ, तिखट आणि मीठ एकत्र करून ठेवा. बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या, त्यात तळाशी अर्धी वाटी मीठ पसरवा. त्यावर तयार कैरीचे कालवण लोणचे घाला. वरून गार केलेली तेलाची फोडणी ओता व परत मीठ पसरवा. बरनीचे तोंड पुसून झाकण लावून फडकं बांधा म्हणजे जास्त दिवस टिकेल. दर २ दिवसांनी सतत लोणचं हलवा.

टीप :
 तेल न टाकता हि कैरीचे असे लोणचे वर्षभर टिकते आणि चवही वेगळी लागते.  
   







Kurdaei Ani Shevyaanchi Mix bhaji

कुरडई आणि शेवयांची मिक्स भाजी 

साहित्य: 
कुरडया साधारण ३, शेवया लांब आकाराच्या १०, तेल फोडणीसाठी २ चमचे, पाणी ३ मोठे पेले, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, हळद १/२ चमचा, खाण्याचा ऑरगॅनिक रंग पिवळा १/२ चमचा, जिरेपूड धणेपूड १ चमचा, गरम मसाला आवडीनुसार, बारीक चिरलेला १ कांदा, १ टमाटा, मटार १/२ वाटी,१ गाजर बारीक चिरून, सजावटीसाठी कोथिंबीर, अमूल बटर १ तुकडा. 

कृती: 
एका मोठ्या पातेल्यात ३ पेले पाणी घेऊन चांगले उकळू द्या. मग त्यात कुरडई आणि शेवई न मोडता घाला. त्यामुळे त्या मऊ होतील आणि मॅगी सारख्या लांबीला मोठ्या दिसतील. साधारण १० मिनिटानंतर शिजून तयार झाल्या कि झारनीतून झारुन घ्या आणि पटकन गार पाण्यात टाका म्हणजे एकमेकींना चिकटणार नाही. कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, टमाटा, गाजर टाकून चांगला परतून घ्या. मग मटार टाकून एक वाफ येऊ द्या. सर्व भाज्यांचा रंग बदल झाला कि त्यात तिखट, हळद गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, अमूल बटर टाका, परतल्यावर त्यात गार पाण्यातील कुरडया आणि शेवया आणि १ पेला पाणी टाकून शिजू द्या. सर्वात शेवटी थोड्या २ चमचे पाण्यात खाण्याचा पिवळा रंग मिक्स करून तयार भाजीत घाला. वरून कोथिंबीर टाका. 
पोळीबरोबर गरमागरम खायला द्या फक्त मोठयांना सांगा कुरडई ची भाजी आणि लहानांना सांगा मॅगी आहे म्हणून मग बघा कशी पटापट संपते.           












Saturday 17 March 2018

Sweet Edible Floating Flowers

 पाकातील फुले 


फुलांसाठी  साहित्य:
रवा १ वाटी, ३ ते ४ फूड कलर तुमच्या आवडीचे, पाणी अंदाजाने १/२ वाटीपेक्षाही कमी

एकतारी पाकासाठी साहित्य आणि कृती:
साखर २ वाट्या, पाणी २ वाटी 
एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून मंद आचेवर उकळू द्या. उकळताना सतत चमच्याने हलवत रहा. म्हणजे साखर भांड्याच्या तळाला लागणार नाही. १५ मिनीटांनी थोड्याशा पाकाला चमच्यानी ताटलीत पडून बघा जर पाकाची तार निघाली तर झाला एकतारी पाक. आचेवरून काढून घेऊन थंड करायला ठेवा. 
   
फुलांवरील दवबिंदूसाठी गोळी पाक साहित्य:
साखर २ चमचे, पाणी ४ चमचे
एकतारी पाक तयार झाल्यावर अजून ५ मिनीटांनी पाक उकळला तर त्याची गोळी बंद पाक तयार होतो.  

फुले तयार करण्यासाठी कृती :

प्रथम रवा घट्ट भिजवून घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. त्या गोळ्यांमध्ये  वेगवेगळे फूड कलर थोडे पाणी टाकून मऊ मळून घ्या. तयार रंगीत गोळ्यांचे फुल बनवण्यासाठी आधी पाकळ्या तयार करून मग त्यापासून फुल तयार करून घ्या. मंद आचेवर तेलात तळून बाजूला काढून ठेवा.     


फुले तळल्यावर थंड झाली कि त्यावर तुमच्या आवडीनुसार गोळीबंद पाकाचे थेम्ब टाकुन दवबिंदू तयार करा. एकतारी पाक गार झाला कि त्यात फुले टाकून मुरू द्या. 




पाक मुरल्यावर वाटीत सर्व्ह करा पाकातील फुले.  












Chival che Wnd

चिवळचे  वन्ड 

साहित्य:
चिवळ ची भाजी ३ वाट्या, मोठा कांदा १, लसूण पाकळ्या ८ ते १०, हिरव्या मिरच्या ५ ते ६, तिखट आवडीनुसार, हळद १ चमचा, आमचूर पावडर २ चमचे, धणेपूड १ चमचा, किसलेली कैरी १/२ वाटी, बेसनपीठ  साधारणपणे आवश्यकतेनुसार ३ वाटी, तळण्यासाठी तेल 

चिवळ ची भाजी अशी दिसते 
कृती:
चिवळची भाजी नीट निवडून धुवून  बारीक चिरावी. पाणी निथळल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा,मिरच्या आणि ठेचलेला लसूण घाला. तिखट, हळद, आमचूर पावडर, किसलेली कैरी आणि हिरवी मिरची बारीक चिरून घालून व्यस्थित मिक्स करा. आता हळूहळू बेसन पीठ टाकून एकत्र करा साधारण घट्ट गोळा तयार करा. पाण्याचा वापर न करता हाताला तेल लावून उभे वन्ड थापा. ते सर्व थापलेले वन्ड डायरेक्ट तेलात न टाकता इडलीपात्रात १५ मिनिटे वाफवून घ्या. मग थंड करून तेलात खरपुस तळून घ्या. 
दही, सॉस अथवा मिरची च्या लोणच्याबरोबर गरमागरम खाण्यास द्या.  

टीप: 
साधारणपणे उन्हाळ्यात मिळणारी भाजी असल्याने शरीराला थंडावा देते. 
हे वन्ड थापल्यानंतर वाफवून घेतले तर आतून कच्चे राहात नाही आणि तेल पण कमी लागते.  









Tuesday 6 March 2018

Dal Bitti & Wangyachi Bhaji Recipi

साधं वरण ,वांग्याची भाजी आणि बिट्टी 

साहित्य:
* बिट्टी तयार करण्यासाठी
२ वाट्या कणिक (गव्हाचे पीठ), १ वाटी रवा, १ चमचा जिरे, १ चमचा ओवा, तेलाचं मोहन ३ चमचे, १/२ चमचा खाण्याचा सोडा, मीठ चवीनुसार , तळण्यासाठी तेल, पाणी आवश्य कतेनुसार,बिट्टी वाफवण्यासाठी इडलीपात्र 
* साध्या वरणासाठी :
तुरीची कुकरमध्ये शिजवलेली डाळ २ वाटी, साजूक तूप १/२ वाटी, हिंग १ चमचा, मीठ चवीनुसार,
* वांग्याच्या भाजीसाठी:
४ ते ५ काळे अथवा जांभळे वांगे, मोहरी १ चमचा, धणेपूड, जिरेपूड प्रत्येकी २ चमचा, हळद १/२ चमचा, काळा मसाला १ चमचा, तेल फोडणीसाठी २ पळी, तिखट आवडीनुसार, मीठ चवीनुसार 

कृती :
एका वाडग्यात कणिक, रवा, जिरे, ओवा,खाण्याचा सोडा आणि मीठ टाकून हाताने एकजीव करा. नंतर तेलाचं मोहन टाकून हळूहळू पाण्यासोबत कणिक घट्ट मिळून घ्या. १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर त्याचे साधारण थोडे मोठे गोळे करून जाडस पुरी लाटा. तिला आतून तेल लावून घडी घाला, पुन्हा तेल लावून त्रिकोणी आकार तयार करा व तिन्ही बाजूनी हातानी हलका दाब देऊन कडा बंद करा.

इडलीपात्रात पाणी टाकून वाफेवर ह्या तयार केलेल्या बिट्ट्या साधारणपणे १५ मिनिटे वाफवून घ्या. नंतर काढून घेऊन गार झाल्यावर सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्या.
*साधं वरण कृती:
कुकर मध्ये तुरीची डाळ चांगली शिजवून घ्या. एकजीव केल्यावर त्यात हिंग आणि साजूक तुपाची फोडणी देऊन कढईत १० मिनिटे उकळू द्या. झाकण ठेऊन वाफ दाबा. 
*झणझणीत वांग्याची भाजी:
वांगी उभ्या फोडी करून चिरा व लागलीच पाण्यात बुडवून ठेवा. म्हणजे काळी पडणार नाही. कढईत तेल गरम करून मोहरी फुटल्यावर त्यात धणेपूड, हिंग,जिरेपूड, तिखट आणि काळा मसाला तेलावर परतून घ्या. नंतर वांगी टाकून झाकण ठेऊन एक वाफ काढा. थोडेसे पाणी टाकून छान मंद आचेवर शिजू द्या. शिजल्यावर शेवटी मीठ टाकून  भांड्यात काढून घ्या. 

सर्व तयार झाल्यावर जेवताना भाजी आणि वरण गरम करून तुपाच्या छोट्या वाटीसह खायला द्या.    
     

















Monday 5 March 2018

Granny's Remedy on Dry-Cough "Chatan"

आजीबाईच्या  बटव्यातील  कोरड्या खोकल्याचे  औषध 
मधाचे चाटण 


साहित्य: 
लवंगा १५ तें २०, मध ४ ते ५ चमचे, १ लोखंडी कढई 


कृती: 
एका लोखंडी कढईत साधारण १५ ते २० लवंगा चांगल्या भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवा. थंड झाल्यावर खलबत्त्याने ठेचून त्याचा भुगा करा. नंतर त्यात ४ ते ५ चमचे मध टाकुन मिक्स करा. 

टीप:
दिवसातून येताजाता एक एक बोट चाटण चाटून खा. कोरड्या खोकल्यावर हमखास परिणाम करणारे औषध आहे. ४ ते ५ दिवसात खोकला बराच कमी झालेला आढळेल. 
  



Saturday 3 March 2018

Spicy Egg Platter

Spicy  Egg  Platter 
साहित्य:
५ उकडून थंड केलेले अंडे, १ टमाटर, १ कांदा, तिखट २ चमचे, चाट मसाला १ चमचा, आमचूर पावडर १ चमचा, 
काळी मिरपूड १ चमचा, मीठ चवीनुसार 

कृती:
एका भांड्यात अंडे साधारण २० मिनिटे उकडून घ्या. ताटलीत कांदा आणि टमाटर बारीक चिरून एकत्र करून घ्या. वाटीत तिखट, चाट मसाला, आमचूर पावडर आणि काळी मिरपूड मिक्स करून चवीनुसार मीठ टाका. 
उकडलेले अंडे थंड झाले कि साल काढून घेऊन एकाचे ४ उभे तुकडे करा. त्यावर वाटीत तयार केलेला मसाला आणि कांदा व टमाटर मिक्स भुरभुरून खायला द्या.   












Friday 2 March 2018

Vidharbh Special Hole Wde (O)

सर्वगुणसंपन्न भोकाचे वडे आणि पकोडे 

साहित्य:
तूमच्या आवडीच्या मिक्स डाळी २ वाट्या भिजवून , आवडते मिक्स कडधान्ये १ वाटी भिजवून, आवडीच्या भाज्या उकडून १ वाटी, मोठा कांदा १ बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून १/२ वाटी, ५ ते ६ हिरव्या लाल मिरच्या बारीक चिरून, कढीपत्ता ६ ते ७ पाने, धणेपूड आणि जिरेपूड प्रत्येकी २ चमचे, तिखट आवडीनुसार, हळद १ चमचा, जिरे १ चमचा, मीठ चवीनुसार 
 कृती:
मिक्सर मधून भिजवून घेतलेले कडधान्ये आणि डाळी पाणी न टाकता हलकेच वाटून घ्या. वाटलेले मिश्रण एका वाडग्यात काढून त्यात वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता घाला. तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, जिरे, मीठ आणि शेवटी उकडून घेतलेल्या भाज्या टाकून व्यस्थित एकजीव करून घ्या. 
 नंतर तळहाताला तेल लावून, त्यावर छोटया आकाराचे गोलाकार वडे थापून, मध्ये छोटेसे छिद्र पाडा. कढईत तेल गरम झाल्यावर सोनेरी रंगावर तळून घ्या. 

तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही छोटे छोटे पकोडे देखील छोट्या चमच्याने तेलात सोडू शकता. गरम तेलावर खरपूस कडक झाल्यावर दही अथवा तुमच्या आवडत्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करू शकता. 
लहान मुलांना केळीच्या पानांचा कोन तयार करून पकोडा कोन चाट खायला देऊ शकता. 













Thursday 1 March 2018

Hrbharyaachi Kachori

हरभऱ्याची कचोरी 

साहित्य :
२ वाट्या हरभऱ्याचे सोललेले दाणे, लसूण पाकळ्या ८ ते १०, हिरव्या मिरचीचा ठेचा ३ चमचे, मीठ आवश्यकतेनुसार, तिखट आवडीनुसार, धणेपूड १ चमचा, जिरे १ चमचा, तेल तळण्यासाठी, कांदा बारीक चिरलेला १ वाटी, मैदा ३ वाटी, पाणी आवश्यकतेनुसार.  


कृती:
एका मोठ्या कढईत २ चमचे तेल टाका. तेल तापल्यावर त्यात हरभरा, कांदा, लसूण, तिखट, धणेपूड, जिरे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून व्यस्थित परतून वाफ येण्यासाठी झाकण ठेवा. साधारणपणे १५ मिनिटे चांगलं परतल्यावर कढईतून काढून घेऊन थंड होण्यासाठी काहीवेळ तसेच ठेवा.

तोपर्यंत एका वाडग्यात मैदा, जिरे आणि तेलाचं मोहन टाकून घट्ट मळून घेऊन १० मिनिटे झाकून ठेवा.

हरभऱ्याचे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये साधारण बारीक वाटून घ्या. तयार मैद्याच्या गोळ्याची पुरी लाटून त्यात हरभऱ्याचे सारण भरून हाताने हलके दाबून गोलाकार आकार द्या.  


कढईत तळण्यासाठी तेल गरम करून त्यात सारण भरलेल्या कचोऱ्या हळूहळू सोडा. 

छान सोनेरी रंगावर आल्या कि अतिरिक्त तेल निथळू देऊन दह्याच्या चटणीबरोबर गरमागरम खायला द्या.